दहशतवाद्याचे 12 बंकर नष्ट, 135 जणांना अटक; मणिपूरमध्ये नक्की काय घडतंय?
Manipur Violence News : दोन महिन्यांपासून मणिपूर धगधगतंच; हालचाली वाढल्या 135 जणांना अटक, वाचा नेमकं काय घडतंय...
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये मागच्या दोन महिन्यंपासून हिंसाचार सुरू आहे. आता पोलीस आणि सुरक्षादल अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मागच्या 24 तासात मणिपूरमध्ये मोठी कारवाई झाली आहे. दहशतवाद्यांनी बांधलेले 12 बंकर सुरक्षा दलांनी नष्ट केले आहेत. तसंच 135 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मणिपूर पोलिसांनी याबाबतचं निवेदन जारी केलं आहे.
पोलिसांच्या निवेदनात काय?
राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी तामेंगलाँग, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, कांगपोकपी, चुराचंदपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये शोध मोहीम राबवली. या कारवाईत दहशतवाद्याचे 12 बंकर उद्ध्वस्त केले आहेत.
सुरक्षादलांच्या या शोध मोहिमेत साहुमफाई गावातील एका भातशेतीत पोलिसांना तीन 51 मिमी मोर्टार शेल, तीन 84 मिमी मोर्टार आणि आयईडी देखील पोलिसांना आढळला. बॉम्बनाशक पथकाने हा आयईडी नष्ट केला आहे. आतापर्यंत एकूण 1,100 शस्त्रं, 13, 702 दारूगोळा आणि विविध प्रकारचे 250 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मणिपूर धगधगतंय. तिथं लावण्यात आलेल्या कर्फ्यूचं उल्लंघन, घरांमध्ये चोरी, जाळपोळ अशा 135 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Manipur violence: Internet ban extended again till June 30
Read @ANI Story | https://t.co/4GzvlTgks3#ManipurViolence #InternetShutDown #Manipur pic.twitter.com/gpl20R9y69
— ANI Digital (@ani_digital) June 25, 2023
सध्या मणिपूरमध्ये नेमकी काय स्थिती?
मणिपूरमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. मणिपूरमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. मात्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सामान्य आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दोन महिने झाले मणिपूर धगधगतं आहे. हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. या हिंसाचारात आतापर्यंत 120 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3 हजारपेक्षा अधिक लोक जखमी आहेत.
मणिपूरमधील सध्याची परिस्थिती पाहता पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात आलं आहे. कोणतीही अफवा आढळल्यास नियंत्रण कक्षाला कळवावं, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 9233522822 या क्रमांकावर फोन करून माहिती कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
जर काही शस्त्रं, दारूगोळा आणि स्फोटकं असल्यास पोलीस आणि सुरक्षा दलांकडे जमा करण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत. मणिपूरमधील संवेदनशील भागात पोलिसांकडून अधिकची काळजी घेतली जाते.
मणिपूरमधली परिस्थिती पाहता मोठा बंदोबस्त मणिपूरमध्ये तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सशस्त्र बलाच्या 84 तुकड्या मणिपूरमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर आसाम रायफल्सचेही 10 हजारांहून अधिक जवान मणिपूरमध्ये तैनात आहेत.