पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्याला जीवे मारण्याची धमकी
PM Narendra Modi Amit Shah Death Threats : नरेंद्र मोदी, अमित शाह यांना जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलीस सतर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना या संदर्भात फोन आला होता. थेट पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने दिल्ली पोलीसही सतर्क झाले आहेत.
दिल्ली पोलिसांनी लगोलग या संदर्भात एक समिती गठीत केली आहे आणि या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
बाह्य जिल्हा पोलिसांच्या पीसीआरला आज सकाळी एक फोन आला. या फोनमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नीतीश कुमार यांनी मारण्याची धमकी देण्यात आली, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांना असा धमकीचा फोन करणाऱ्या तरूणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. संजय वर्मा असं धमकी देणाऱ्या तरूणाचं नाव आहे. संजय दिल्लीतील मादीपूर भागातील रहिवासी आहे.
संजय वर्मा याच्या कुटुंबाने त्याच्या विषयी माहिती दिली आहे. तो कालपासूनच दारू पित आहे. तो नशेत आहे. याच नशेत त्याने फोन केला असावा, असं संजयच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.
पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना धमकी देण्यात आल्याने दिल्ली पोलीस सतर्क झाले आहे. या प्रकरणाची ते कसून चौकशी करत आहेत. पोलिसांना आलेला फोन, फोन करणारा युवक संजय वर्मा याचीही पोलीस चौकशी करत आहेत. हा फोन त्याने का केला? कुणाच्या सांगण्यावरून केला? याचा पोलीस शोध घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांच्या विविध बैठका आणि कार्यक्रमांचं आयोजिन करण्यात आलं आहे. तिथे मोदींना एसपीजी आणि अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसेसची सुरक्षा आहे.
तर अमित शाह यांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांवर आहे. प्रोटोकॉल नुसार त्यांना झेड सुरक्षा आहे.
दरम्यान, 15 जून रोजी देखील नीतीश कुमार यांच्यासोबत एक घटना घडली होती. त्यामुळे बिहारचं राजकीय वर्तुळ हादरलं होतं. 15 जूनला सकाळी नीतीश कुमार हे सकाळी मॉर्निंग वॉक करत होते. सर्क्युलर रोडवर नितेश कुमार मॉर्निंग वॉक करत होते. मॉर्निंग वॉक करत असतानाच पटनातील मुख्यमंत्री निवासस्थान परिसरात अचानक दोन बाईकस्वार घुसले. त्यांनी गाडी नीतीश कुमार यांच्याजवळ नेली. पण धोका लक्षात आला आणि नितीश कुमार हे लगेचच फुटपाथवर चढले. त्यामुळे ते अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.