Parliament Special Session 2023 : भारतासाठी ऐतिहासिक क्षण; जुन्या संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेवटचं भाषण
PM Narendra Modi Last Speech in Old Parliament Building Central Hall : भारतासाठी आज ऐतिहासिक क्षण... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनात आज शेवटचं भाषण केलं. यावेळी पंतप्रधान मोदी काय म्हणालेत? पाहा...
नवी दिल्ली | 19 सप्टेंबर 2023 : संसदेचं विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. जुन्या संसदभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित खासदारांसह देशाला संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाचा इतिहास सर्वांसमोर मांडला. देशाच्या राजकीय इतिहासातील महत्वाचे टप्पे देशासमोर ठेवले. यावेळी आपल्या भारत देशाने कशी प्रगती केली, आपण आत्मनिर्भर कसे होत आहोत, यावरही पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं. तसंच त्यांची पुढची देशाची वाटचाल कशी असेल यावरही भाष्य केलं. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.
गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनाला सुरुवात केली. नवीन इमारतीत नवीन संकल्प करण्यासाठी आपण जात आहोत. नवीन आशा घेवून आपण जात आहोत. हा क्षण आपल्याला भावूक करतो आणि प्रेरितही करतो आहे. संविधान सभाची बैठक इथे सुरु झाली आणि चर्चेतून संविधान तयार झालं. इथेच आपण इंग्रजांकडून सत्तेच हस्तांतरण झालं आहे. त्याची साक्ष हा सेंट्रल हॉल आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
संसदेची ही इमारत इतिहासाची साक्षिदार आहे. अनेक मोठमोठे निर्णय याच संसद भवनात मांडले गेले. आतापर्यंत आपल्या राष्ट्रपतींनी 86 वेळा इथूनच देशाला संबोधित केलं आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाने मिळून 4 हजार कायदे तयार केले. याच सभागृहात मुस्लिम समजातील महिलांना न्याय मिळाला. तीन तलाक विरोधी कायदा इथेच तयार झाला. आपलं सौभाग्य आहे की, कलम 370 पासून आम्हाला मुक्तता मिळाली ती याच सभागृहात…, असंही मोदी म्हणाले.
जे संविधान पूर्वजांनी तयार केलं ते जम्मू काश्मीर मध्ये लागू झालं. आज जम्मू काश्मीर विकासाच्या दिसेने वाटचाल करतंय. लाल किल्ल्यावर मी म्हटलं होतं की, हीच ती वेळ आहे… भारत आज नवीन चेतना घेवून जागृत झाला आहे. भारत आज नवीन संकल्प घेवून पुढे जातोय. मी आज विश्वासाने सांगतो की, आपल्यातल्या काही लोकांची निराशा होवू शकतात. मात्र आज भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.