राहुल गांधींच्या हिंदुंबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने संसदेत सत्ताधाऱ्यांचा गोंधळ; अमित शाह म्हणाले…
Rahul Gandhi Statement About Hindu in Parliament : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण केलं. यावेळी राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत एक विधान केलं. राहुल गांधी यांनी केलेल्या या विधानामुळे लोकसभेत गोंधळाचं वातावरण झालं. अमित शाह यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
2024 ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आणि एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर संसदेचं पहिलं अधिवेशन होत आहे. पावसाळी अधिवेशनात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज भाषण केलं. या भाषणा दरम्यान राहुल गांधी यांनी हिंदुंबाबत केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा होतेय. सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. आरएसएस म्हणजे हिंदुत्व नाही, असं राहुल गांधी म्हणाले. संसदेतही सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, असं अमित शाह म्हणाले.
संसदेत नेमकं काय घडलं?
सत्ताधारी पक्षाचे लोक हिंदू नाहीत. भाजप हिंसा पसरवत आहे, असं विधान राहुल गांधी यांनी म्हटलं. यावरून सत्ताधारी पक्षातील खासदारांनी गोंधळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घेतला. सर्व हिंदूंना हिंसक म्हणणं चुकीचं असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला. राहुल गांधी यांनी केलेलं विधान आक्षेपार्ह आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी अमित शाह यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीला काय म्हटलं?
‘जय संविधान’ म्हणत राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणाला सुरूवात केली. गेल्या 10 वर्षात पद्धतीशीरपणे संविधानावर, ‘आयडिया ऑफ इंडिया’ वर हल्ला केला जात आहे. काही आमच्या नेत्यांवर हल्ल्ला केला जात आहे. लोकांना कारागृहात टाकलं जात आहे. लोकांना धमकावले जात आहे. आम्ही देशांच्या संविधानाचं रक्षण केलं आहे, असं राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणावेळी म्हटलं आहे.
सरकारच्या आदेशावरून माझ्यावर हल्ले केले गेले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले. भगवान शंकराचं चित्र दाखवणं चुकीचं आहे का? संविधानाचं चित्र दाखवणे गुन्हा आहे का? असं म्हणत जय महादेव…, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दिली. भगवान शंकर आमच्यासाठी प्रेरणा आहेत. भगवान शंकराच्या डाव्या हातात त्रिशुल हे अहिंसेचं प्रतिक आहे. इस्लाममध्ये देखील घाबरू नका, असं सांगितलं आहे. गुरूनानकजी नी सांगितले आहे घाबरू नका, असं राहुल गांधी म्हणाले.