नितीश कुमारांना मोठा झटका; भाजपने JDU चे सहा आमदार फोडले
सहा आमदारांना भाजपने गळाला लावल्याने अरूणाचल विधानसभेत आता 'जदयू'चा केवळ एक आमदार शिल्लक राहिला आहे. | Nitish Kumar Loses 6 MLA
इटानगर: भाजपच्या मेहरबानीने बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेल्या नितीश कुमार (Nitish Kumar) यांना मोठा झटका बसला आहे. भाजपने अरूणाचल प्रदेशात नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (JDU) सहा आमदार स्वत:च्या गोटात खेचून घेतले आहेत. अरूणाचल प्रदेशात ‘जदयू’चे सात आमदार होते. मात्र, त्यापैकी सहा आमदारांना भाजपने गळाला लावल्याने अरूणाचल विधानसभेत आता ‘जदयू’चा केवळ एक आमदार शिल्लक राहिला आहे. याशिवाय, पीपल्स पार्टी ऑफ अरूणाचल (PPA) पक्षाच्या करदो निग्योर यांनीही भाजपचे कमळ हातात धरले आहे. (Six JDU MLA joins BJP in Arunachal Pradesh)
अरूणाचल प्रदेशात शनिवारी ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच अरूणाचल प्रदेशात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.
‘जदयू’ने आमदारांना पाठवली होती नोटीस
‘जदयू’च्या सहा आमदारांनी शुक्रवारी भाजपची वाट धरली. यामध्ये रमगोंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार तालीम तबोह, चायांग्ताजोचे हेयेंग मंग्फी, ताली येथील जिकके ताको, कलाक्तंगचे दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिला येथील डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकु मतदारसंघातील कांगगोंग टाकू यांचा समावेश आहे.
नितीश कुमार यांना या सगळ्याचा अगोदरच अंदाज आला होता. त्यामुळे सियनग्जू, खर्मा आणि कांगगोंग टाकू यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी नोटीस पाठवून पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
या सहा आमदारांनी यापूर्वीही पक्षाला कल्पना न देता तालीम तबोह यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली होती. तालीम तबोह यांचीही काही दिवसांपूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. या सगळ्यावर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आम्ही ‘जदयू’च्या आमदारांचे पक्षात प्रवेश करण्याचे पत्र स्वीकारल्याची माहिती अरूणाचल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीआर वाघे यांनी दिली.
संबंधित बातम्या:
नितीश कुमार भलेही मुख्यमंत्री होतील पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल, काँग्रेस नेत्याचा निशाणा
Nitish Kumar cabinet : बिहारमध्ये भाजप-जेडीयूचे 7-7 मंत्री, भाजपच्या खात्यात दोन उपमुख्यमंत्रिपदं
(Six JDU MLA joins BJP in Arunachal Pradesh)