बिहारचं भाजप सरकार धोक्यात? नितीश कुमारांची आर पारची भाषा
जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करत होते. त्यावेळी आपल्याला कुठल्याही पदाचा मोह नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला. मात्र विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला मोठं नुकसान सहन करावं लागलं. अशास्थितीतही भाजपनं आपल्या शब्द न बदलता नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच सत्ता स्थापन केली. पण नितीश कुमार आता हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 27 डिसेंबरला झालेल्या जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आता आपल्याला मुख्यमंत्री राहायचं नाही, असं नितीश कुमार म्हणाले. (Nitish Kumar’s big statement about the Chief Minister of Bihar)
“आता मला मुख्यमंत्री राहायचं नाही. एनडीएनं कुणालाही मुख्यमंत्री बनवावं. भाजपचा मुख्यमंत्री झाला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. आपल्याला कुठल्याही पदाचा मोह नाही,” असं नितीश कुमार म्हणाले आहेत. जदयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नितीश कुमारांनी केलेल्या या वक्तव्यामुळं बिहारच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करत होते. त्यावेळी आपल्याला कुठल्याही पदाचा मोह नसल्याचं त्यांनी म्हटलंय. निवडणूक निकाल आल्यानंतरही युतीच्या नेत्यांसमोर आपण भूमिका स्पष्ट केली होती. पण दबाव इतका होती की पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळावी लागली, असं नितीश कुमार म्हणाले. आम्ही स्वार्थासाठी काम करत नाही. आजपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड केली नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
अरुणाचलमधील जदयूचे 6 आमदार भाजपमध्ये!
एकीकडे भाजपने जनता दल युनायटेडसोबत बिहारमध्ये सत्तास्थापन केली आहे. तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशातील जदयूच्या 6 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर बोलताना “6 गेले म्हणून काय झालं. अद्याप 1 आमदार पक्षातच आहे. पक्षाची ताकद लक्षात घ्या. आपल्याला सिद्धांतांच्या आधारावरच लोकांमध्ये जायचं आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरु आहे. पण आपण त्याविरोधात आहोत. आपल्याला प्रत्येक काम लोकांच्या भल्यासाठीच करायचं आहे”, असं नितीश कुमार यावेळी म्हणाले.
‘पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा, काम करत राहणार’
नितीश कुमार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर बोलताना नितीश यांनी आपण अध्यक्षपद सोडलं आहे, पक्ष नाही. पक्षासाठी रात्रंदिवस काम करत राहणार. राज्याची जबाबदारी सांभाळताना पक्षाध्यक्षपदाचं काम चांगल्यारितीनं होत नाही. पक्षाचं काम अधिक मजबूत आणि गतीनं होणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्ष पोहोचायला हवा. त्यासाठीच आपण राजीनामा दिल्याचं नितीश कुमार म्हणाले.
संबंधित बातम्या:
बिहारच्या शेतकऱ्यांना मोठा झटका, 63 कृषी उपकरणांवरील सब्सिडी रद्द
भाजपने सहा आमदार फोडले; तरीही नितीश कुमार यांना फरक का पडत नाही?
Nitish Kumar’s big statement about the Chief Minister of Bihar