Noida Tower Demolition : कसा होणार ट्विन टॉवर ब्लास्ट? शेवटचे 60 सेकंद महत्त्वाचे; एकामागून एक स्फोट आणि…
दुपारी अडीच वाजता नोएडामधील हे ट्विन टॉवर पाडले जाणार आहे. हे दोन्ही टॉवर पडायला फक्त 12 सेकंद लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटापूर्वीचे शेवटचे 60 सेकंद अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
नोएडा : नोएडामधील सुपरटेकचे बेकायदेशीर ट्विन टॉवर (Noida Supertech Twin Towers Demolition) आज जमीनदोस्त होणार आहे. ही इमारत सुमारे 100 मीटर उंच आहे, जी कुतुबमिनारच्या उंचीपेक्षाही जास्त आहे. याविषयी ही इमारत पाडण्याचे काम करणाऱ्या एडफिस इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्याने सांगितले, की वॉटर फॉल इम्प्लोशन तंत्राने ती सुरक्षितपणे पाडली जाणार आहे. स्फोटापूर्वीचे (Blast) 60 सेकंद खूप महत्त्वाचे असतात. ते म्हणाले, की एपेक्स टॉवर (32 मजली) आणि सियान (29 मजली) या दोन इमारती 12 सेकंदांपेक्षा कमी वेळात पत्त्याच्या डेकप्रमाणे पाडल्या जातील. आजूबाजूच्या इमारतींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. आजूबाजूच्या इमारतींमध्ये रंग आणि प्लास्टरला किरकोळ भेगा पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कोणतेही नुकसान (Damage) होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
60 सेकंद अत्यंत महत्त्वाचे
आज दुपारी अडीच वाजता नोएडामधील हे ट्विन टॉवर पाडले जाणार आहे. हे दोन्ही टॉवर पडायला फक्त 12 सेकंद लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटापूर्वीचे शेवटचे 60 सेकंद अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. दुपारी 2.29 वाजता इमारत पाडण्याचे तज्ज्ञ चेतन दत्ता ब्लॅक बॉक्सला जोडलेले हँडल 10 वेळा फिरवतील, त्यानंतर त्याचा लाल बल्ब चमकेल. याचा अर्थ चार्जर स्फोटासाठी तयार आहे, असा होतो. नंतर चेतन दत्ता हिरवे बटण दाबतील. यामुळे चारही डिटोनेटरवर विद्युत लहरी जातील. यानंतर 9 ते 12 सेकंदात इमारतीत एकामागून एक स्फोट सुरू होतील. स्फोट होताच ही इमारत काही सेकंदांत कोसळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिले होते पाडण्याचे आदेश
ऑगस्ट 2021मध्ये सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. ट्विन टॉवर्स आज पाडण्याच्या पार्श्वभूमीवर, एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेज या जवळपासच्या दोन सोसायट्यांमधील सुमारे 5,000 रहिवाशांना सकाळी 7 वाजता घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले. सुमारे 2700 वाहने आणि पाळीव प्राणी सोबत घेऊन जाण्याच्या सूचनाही रहिवाशांना देण्यात आल्या.
500 मीटरच्या परिघात कोणालाही परवानगी नाही
ट्विन टॉवर्सच्या 500 मीटरच्या आत कोणत्याही व्यक्ती किंवा प्राण्याला परवानगी नाही. दोन्ही टॉवर रिकामे करण्यासाठी 3700 किलो स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. एका अंदाजानुसार, ट्विन टॉवरच्या पडझडीतून 55 ते 80 हजार टन राडारोडा बाहेर पडणार असून, तो हटवण्यासाठी किमान तीन महिने लागतील.