Omicron in India| पंतप्रधान आज मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची शक्यता; कोरोना संकटावर होणार मंथन
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत आहेत. बंगालमध्ये 5 जानेवारी रोजी 24 तासांत 14,000 हून अधिक नवीन रुग्णांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली: देशभरात झपाट्याने वाढलेले कोरोना रुग्ण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत देशातील वाढते कोरोना संकट हाताळण्यासाठी काय करावे, या कठीण प्रसंगी साऱ्यांनी मिळून कसे लढावे, यावर या मंथन होणार असल्याने याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.
ममता राहणार उपस्थित
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत आहेत. बंगालमध्ये 5 जानेवारी रोजी 24 तासांत 14,000 हून अधिक नवीन रुग्णांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हावडा जिल्ह्यात ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यात दररोज कोविड -19 रुग्णांची संख्या 14,022 आहे. त्यात सक्रिय रुग्णांची संख्या 33,042 वर पोहोचली आहे. मी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या आभासी बैठकीला उपस्थित राहणार आहे.
निर्बंध वाढवणार
पश्चिम बंगालमधील कोरोना संकटाची माहिती देताना ममता पुढे म्हणाल्या की, आंतरराज्यीय सीमावर्ती भागातील हालचालींसाठी अनिवार्य RT-PCR चाचणीसह निर्बंध वाढवण्यात येतील. या भागात एकूण 2,075 कोरोना रूग्ण रुग्णालयात दाखल आहेत आणि तब्बल 403 क्षेत्र कंटेन्मेंट झोन आहेत. पॉझिटिव्ह दर 23.17 टक्के आहे, मृत्यू दर 1.18 टक्के आहे आणि सुमारे 19,517 बेड उपलब्ध आहेत. आंतरराज्यीय सीमेसाठी RT-PCR आवश्यक असून, बंगालसाठी पुढील 15 दिवस महत्त्वाचे आहेत. त्यासाठी निर्बंध वाढवण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
निवडणुकांचे काय?
एकीकडे देशभरात कोरोनाचा उद्रेक होताना दिसतो आहे. दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यताय. त्यातच उत्तर प्रदेशसह इतर विधानसभा निवडणुका येणाऱ्या काळात आहेत. पंतप्रधान आज त्यावर काही बोलतात का, याकडेही लक्ष आहे. कारण निवडणुका म्हटला की प्रचार आणि सभा आल्याच. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा तडाखा वाढू शकतो. जास्त रुग्णांची संख्या झाल्यास दुसऱ्या लाटेप्रमाणे सुविधा अपुऱ्या पडू शकतात. हे पाहता, यावर या बैठकीत काय सूर असू शकतो, याकडेही साऱ्यांचे लक्ष असेल.
इतर बातम्याः
Nashik Corona| नाशिकमधील शाळा सोमवारपासून बंद; कुठले वर्ग राहणार सुरू?
नाशकात ITI चे सहसंचालक 5 लाखांची लाच घेताना अटक, 1 कोटी 61 लाखांची मालमत्ता जप्त
Nashik |नाशिकमध्ये 52 हजार 324 नवमतदार; एकूण संख्या तब्बल 46 लाखांच्या पुढे, पण दुबार नावांचे काय?