Bihar : पहिल्याच श्रावण सोमवारी बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात चेंगराचेंगरी, दोन महिलांचा मृत्यू, दोन जखमी
श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिसवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात भल्या पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. यामध्ये विशेषत: महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गर्दीमध्ये काही महिला ह्या जमिनीवर पडल्या. त्यांना उठवण्याचीही संधी उपस्थितांना मिळाली नाही.
बिहार : (Shrawan) श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी सिवान जिल्ह्यातील (Baba Mahendranath Dham Temple) बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी (Crowd of devotees) मोठी गर्दी केली होती. यामुळे मंदिरात दर्शनाच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर दोघी जखमी आहेत. वाढत्या गर्दीमुळे ही घटना घडली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर मात्र, मंदिर आणि परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर बंद होते. त्यामुळे यंदा पहिल्याच सोमवारी भाविकांची गर्दी वाढली होती. सिसवान ब्लॉकमधील बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात जलाभिषेकादरम्यान ही घटना घडली.
महिलांना वाचवण्याचीही संधी मिळाली नाही
श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिसवान जिल्ह्यातील बाबा महेंद्रनाथ धाम मंदिरात भल्या पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. यामध्ये विशेषत: महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गर्दीमध्ये काही महिला ह्या जमिनीवर पडल्या. त्यांना उठवण्याचीही संधी उपस्थितांना मिळाली नाही. यामध्ये प्रतापपुर गावच्या लीलावती देवी (वय- 42 वर्ष) व पाथर गावच्या सुहागमती देवी (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहदुल्लेपूर गावच्या शिवकुमारी देवी आणि प्रतापपुरच्या अंजुरिया देवी ह्या जखमी झाल्या आहेत.
दोन वर्षानंतर मंदिर खुले
सिसवान जिल्ह्यातील हे बाबा महेंद्रनाथ धाम मंदिर तब्बल दोन वर्षानंतर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुशंगाने हे मंदिर बंद होते. पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिर खुले करण्यात आले आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी पुरेसा बंदोबस्तही नव्हता. शिवाय नियमांचे पालन न झाल्यामुळेच ही दुर्घटना घडली आहे.
पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच घडली घटना
श्रावण सोमवारच्या महिन्याचे महत्व लक्षात घेता मंदिर आणि परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असणे गरजेचे होते. मात्र, घटनेच्या दरम्यान पोलिस तैनात नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. शिवाय घटना घडून गेल्यानंतर मंदिरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वेळीच खबरदारी घेतली असती तर दुर्घटना टळली असती असे भाविकांचे मत आहे.