Pahalgam Terrorist Attack : पैशांचा लोभ पर्यटकांच्या जीवावर उठला, या दोघांनी आपल्याच देशाला दिला धोका
Pahalgam Terrorist Attack : दिल्लीत केंद्र सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आपला मुद्दा मांडला. या दरम्यान कुठलीही वादावादी झाली नाही. सरकारकडून जे पाऊल उचललं जाईल, त्याचं समर्थन करु असं खासदारांनी जाहीर केलं आहे. पेहेलगाममध्ये नेमकी चूक कुठे झाली? कोण याला जबाबदार आहे? ते सुद्धा समोर आलं आहे.

पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने हल्लेखोर आणि त्यांच्या मास्टरमाइंडसना कठोर शिक्षा देण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे. विरोधी पक्षांनी सुद्धा दहशतवादाविरुद्ध कुठल्याही प्रकारच्या कारवाईत सरकारला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. यामध्ये सरकारने सुरक्षेत चूक झाल्याच कबूल केलं. पर्यटकांना बैसरन येथे नेण्यात येत आहे, याची प्रशासनाला माहितीच नव्हती. पैशांच्या हव्यासापोटी काही लोक पर्यटकांना बैसरनपर्यंत घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.
काश्मीर खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याच्या उद्देशाने पेहेलगाम खोऱ्यात हल्ला करण्यात आलाय असं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याने अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात होती. इथे पर्यटकांचा ओघ वाढत होता. त्याचा स्थानिकांना फायदा मिळत होता.
सुरक्षा रक्षकांची तिथे तैनाती का करण्यात आली नव्हती?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक झाली. यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी पर्यटन स्थळी सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याचा मुद्दा मांडला. सूत्रांनी ही माहिती दिली. सुरक्षा रक्षकांची तिथे तैनाती का करण्यात आली नव्हती? हा प्रश्न विचारला. राहुलप्रमाणे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुद्धा प्रश्न विचारला. सुरक्षेत चूक झालीय आणि हल्ल्यानंतर सरकारकडून तात्काळ कारवाई का करण्यात आली नाही.
या घटनेला तिथले दोन घटक प्रामुख्याने जबाबदार
पेहेलगाम येथे 28 निरपराधांचा मृत्यू झाला, या घटनेला तिथले दोन घटक प्रामुख्याने जबाबदार आहेत, एक म्हणजे टूर ऑपरेटर आणि दुसरे स्थानिक हॉटेल मालक. कारण पर्यटकांना बैसरन येथे घेऊन जात असल्याच त्यांनी प्रशासनापासून लपवून ठेवलं. परिणामी पेहेलगाम येथे सैनिक असूनही प्रशासन त्यांना बैसरन इथे तैनात करु शकलं नाही.
सरकारने बैठकीत काय सांगितलं?
सूत्रांनुसार, सरकारकडून बैठकीत सांगण्यात आलं की, पेहेलगाममध्ये सैनिक होते. पण त्यांना तिथे तैनात केलं नाही. कारण स्थानिक अधिकाऱ्यांना पर्यटकांना बैसरन इथे नेलं जातय, याची माहितीच नव्हती. पर्यटकांना बैसरन येथे नेत असल्याची टूर ऑपरेटर्स आणि स्थानिक हॉटेल मालकांनी अधिकाऱ्यांना माहितीच दिली नव्हती असं सरकारकडून सांगण्यात आल्याच सूत्रांनी सांगितलं.