फक्त ‘या’ ॲपमुळे पहलगाममध्ये दहशतवादी पर्यटकांपर्यंत पोहोचू शकले, अन्यथा..
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी दहशतवादी हल्ला हा नियोजित होता. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने हे दहशतवादी हल्ला करण्यात यशस्वी झाल्याचा दावा केला जातोय. त्यांना हल्ल्यासाठी सीमेपलीकडून प्रशिक्षण देण्यात आलं होतं.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात सात दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. त्यापैकी चार ते पाच जण हे पाकिस्तानातून घुसखोरी करून आले असण्याची शक्यता आहे. शिवाय हल्लेखोरांच्या शरीरांवर कॅमेरे लावण्यात आल्याची शंकाही जम्मू-काश्मीरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बोलून दाखवली. या हल्ल्याबाबत सतत नवनवीन खुलासे होते आहेत. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे एक खास मोबाइल ॲप होतं, ज्याचा वापर करून ते पहलगामच्या घनदाट जंगलातून बैसरन परिसरात पोहोचू शकले, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.
दहशतवाद्यांनी पहलगामच्या घनदाट जंगलातील बैसरन या पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी अल्पाइन क्वेस्ट ॲप्लिकेशनचा वापर केला होता. याआधीही दहशतवाद्यांनी जम्मूच्या जंगलात दहशतवादी हल्ले करण्यासाठी या ॲपचा वापर केला होता. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे ॲप ट्रॅक करण्यात आलं आणि ते टाळण्यासाठी दहशतवाद्यांनी पहलगामच्या जंगलात त्याचा वापर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशनद्वारे दहशतवादी पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी पोहोचू शकले.
या हल्ल्याचा तपास करणाऱ्या तपास संस्थांच्या मते, पाकिस्तानी लष्कराने त्यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून ट्रॅकिंग टाळण्यासाठी मदत केली होती. हे मोबाइल ॲप पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने विकसित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर मोबाइल ॲप बनवल्यानंतर त्याच्या वापराबद्दल त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं होतं. सीमेपलीकडील त्यांच्या हँडलर्सनी दहशतवाद्यांना ते ॲप कसं वापरायचं, याचं प्रशिक्षण दिलं होतं.




दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्यामागील मुख्य हेतू अमरनाथ यात्रेपूर्वी यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये दहशत निर्माणकरण्याचा होता. या हल्ल्यामागे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ असल्याचा संशय आहे. ‘रेझिस्टन्स फ्रंट’चे ‘हिट स्क्वॉड’ आणि ‘फाल्कन स्क्वॉड’ असे हल्ले करण्यात तज्ज्ञ आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांपैकी काहीजण हे पाकिस्तानमध्ये बोलल्या जाणाऱ्या शैलीत उर्दू बोलत होते. मात्र कमीत कमी दोन स्थानिक अतिरेकी त्यांच्यासोबत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ते काश्मीरच्या कोणत्या भागातून आले होते, याबाबत स्पष्टता झाली नसली तरी ते पीर पंजाल परिसरातील डोंगराळ भागाचे रहिवासी असण्याची शक्यता आहे.