Pahalgam Terror Attack : सर्वात मोठा खुलासा… पहलगाममध्ये किती अतिरेक्यांनी केला हल्ला?; झाडावर चढून फोटोग्राफरने…
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. चार दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात आधुनिक शस्त्रे वापरली गेली. एक फोटोग्राफरने हल्ल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे जो तपासासाठी महत्त्वाचा आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याबद्दल सातत्याने नवनवीन खुलासे समोर येत आहेत. हा हल्ला चार दहशतवाद्यांनी केल्याची माहिती आता समोर आली आहे. हे दहशतवादी एके-47 आणि एम 4 रायफल्ससारख्या आधुनिक शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. आता या हल्ल्याच्या वेळी आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका फोटोग्राफरने स्वत:चा जीव धोक्यात घालून झाडावर चढून काढलेला असल्याचे बोललं जात आहे.
मंगळवारी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दुपारी हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा सध्या कसून तपास सुरु आहे. या हल्ल्यात ४ दहशतवादी सहभागी होते. या चौघांनी मिळून पहलगामच्या पर्यटकांना लक्ष्य केले. त्यांच्याजवळ एके-47 आणि एम4 सारख्या अत्याधुनिक रायफल्स होत्या. तसेच घटनास्थळावरून या रायफल्सची काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. ही काडतुसे तपासाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत.
घनदाट जंगलातून चालत बैसरनमध्ये पोहोचले
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी घनदाट जंगलातून २२ तास पायी चालत बैसरनच्या मैदानी भागात पोहोचले होते, असा दावा केला जात आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांपैकी ३ नागरिक पाकिस्तानातील होते. तर एक दहशतवादी आदिल ठोकर हा स्थानिक होता. या हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी दोन जणांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले, यातील एक फोन हा पर्यटकाचा होता. तर एक फोन हा स्थानिक नागरिकाचा असल्याचे बोलल जात आहे.
स्थानिक फोटोग्राफरकडून व्हिडीओ रेकॉर्ड
या हल्ल्याचा तपास एनआयएकडून केला जात आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दहशतवादी हल्ला करत होते, तेव्हा एका स्थानिक फोटोग्राफरने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यावेळी तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला होता. त्यामुळे हा व्हिडीओ तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या घटनेचे इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवला. यात भारतीय लष्कराच्या एका लेफ्टनंट कर्नलचाही समावेश आहे. जे घटनास्थळी उपस्थित होते.
जम्मू-कश्मीर विधानसभेत आमदारांनी वाहिली श्रद्धांजली
दरम्यान, आज सोमवारी जम्मू-कश्मीर विधानसभेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या २६ लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी काही आमदारांनी मौन पाळले. विधानसभेचे विशेष सत्र सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अब्दुल रहीम राठेर यांनी निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा निषेध केला. “या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो.” असे विधानसभा अध्यक्ष अब्दुल रहीम राठेर यांनी म्हटले.
