’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात दीपोत्सव साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी 22 जानेवारीला घराघरात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे.
अयोध्या | 30 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन झालं. त्यांच्या हस्ते आज पुनर्विकासीत करण्यात आलेल्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन झालं. तसेच त्यांच्या हस्ते अयोध्या विमानतळाचं देखील उद्घाटन झालं. नरेंद्र मोदी यांनी विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देशातील नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं. अयोध्येतील राम मंदिराचं 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या दिवशी देशातील सर्व नागरिकांनी दीपोत्सव साजरी करा, घराघरात दिवे लावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं.
“मी देशातील संपूर्ण 140 कोटी नागरिकांना प्रार्थना करतो की, 22 जानेवारीला सर्वांनी श्रीराम ज्योती लावा. दीपावली साजरी करा. 22 जानेवारीची संध्याकाळ पूर्णपणे झगमगित असायला हवी”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. “फक्त आता काही दिवस वाट पाहा, साडे 500 वर्षांचं काम आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशा प्रसंगात अयोध्येच्या नागरिकांमध्ये उत्साह असणं हे स्वाभाविक आहे. भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि जनाचा मी पुजारी आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच उत्सुक आहे”, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
‘एक काळ असा होता की, रामलल्ला तंबूत विराजमान होते’
“एक काळ असा होता की, रामलल्ला तंबूत विराजमान होते. आज फक्त रामलल्लाला पक्क घर मिळत नाहीय तर 4 कोटी गरिबांनादेखील मिळालं आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले. “आज भारत कशी विश्वनाथच्या निर्माणासोबत 30 हजारपेक्षा जास्त पंचायत घर तयार झाले. आज देशात महाकाल महालोकचं निर्माण झालं नाही तर हर घर हर जल पोहोचलं. अयोध्येत आज विकासची भव्यता दिसत आहे. काही दिवसांनी भव्यता आणि दिव्यता दोन्ही दिसतील. हीच गोष्ट भारताला 21 व्या शतकात पुढे घेऊन जाणार आहे”, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
“देशाच्या इतिहासात 30 डिसेंबरची तारीख खूप ऐतिहासिक राहिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजच्याच दिवसी 1943 मध्ये अंदमानमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा जयघोषाचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्याच्या दिवशी जोडल्या गेलेल्या अशा पवित्र दिवशी आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळ संकल्पाला पुढे नेत आहोत. आज विकसित भारताच्या निर्माणाला गती देण्याच्या अभियानाला अयोध्या नगरीला नवी ऊर्जा मिळाली. आज इथे 15 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण झालं आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.