पंतप्रधान मोदी गर्विष्ठ, अहंकारी राजाला जनताच उत्तर देईल; प्रियंका गांधी गरजल्या
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात राजघाटावर संकल्प सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधींनी बड्या विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तरीही तुम्हा त्यांना पप्पू म्हणून हिणवता. राहुल गांधी पप्पू नाहीये हे तुम्हालाही कळून चुकलं आहे. राहुल गांधींना जनता साथ देत आहे. राहुल गांधी यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नामुळे ते हादरून गेले आहेत, असं सांगतानाच आपल्या देशाचे पंतप्रधान घाबरट आहेत. ते अहंकारी आहेत. सत्तेच्या ढाली पाठी ते लपले आहेत. तुम्ही माझ्यावर केस दाखल करा, तुरुंगात पाठवा. पण सत्य बदलणार नाही. अहंकारी राजाला जनता उत्तर देणारच, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीत राजघाटावर संकल्प सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यावेळी त्या संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीका केली. ते आमच्या कुटुंबाचा अपमान करतात. संसदेत माझ्या भावाने मोदींची गळाभेट घेतली. मी तुमचा द्वेष करत नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. आमची विचारधारा द्वेषाची नाही, असं माझ्या भावाने मोदींना सांगितलं, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माझ्या कुटुंबाने रक्त सांडलं आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
प्रभू श्रीरामालाही घराणेशाहीवादी म्हणायचे का?
घराणेशाहीवरून भाजपकडून गांधी कुटुंबावर वारंवार हल्ला केला जात आहे. भाजपच्या या हल्ल्याला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आम्हाला घराणेशाहीवरून हिणवता तर भगवान राम कोण होते? प्रभू रामाला वनवासात पाठवलं गेलं. तेव्हा त्यांनी आपलं कुटुंब आणि या धरणीमातेच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य निभावलं. मग प्रभू श्रीरामालाही घराणेशाहीवादी म्हणायचे का? आपल्या कुटुंबाच्या संस्कारासाठी लढणारे पांडवही घराणेशाहीचे समर्थक होते काय? आमच्या घरातील लोक या देशासाठी शहीद झाले याची आम्हाला लाज वाटली पाहिजे का?, असा संतप्त सवाल प्रियंका गांधी यांनी केला.
वडिलांच्या पार्थिवापाठोपाठ
यावेळी प्रियंका गांधी यांनी एक प्रसंग सांगितला. राजीव गांधी यांच्या हत्येचा हा किस्सा होता. 1991मध्ये माझ्या वडिलांची अंत्ययात्रा मूर्ती भवनमधून निघाली होती. माझ्या आईसोबत आम्ही दोघे भावंडं गाडीत बसलो होतो. समोरून भारतीय लष्कराचा एक फुलांनी सजलेला ट्रक चालला होता. त्यावर माझ्या वडिलांचं पार्थिव होतं. अंत्ययात्रा थोडी पुढे गेली. तेव्हा माझा भाऊ (राहुल गांधी) म्हणाला मला उतरायचं आहे. सुरक्षा व्यवस्था असल्याने माझ्या आईने त्याला मनाई केली. पण राहुल उतरला. तो त्या ट्रकच्या मागोमाग चालू लागला. रणरणतं उन होतं. तरीही तो चालत होता. त्यानंतर त्याने माझ्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला, असं प्रियंका यांनी सांगितलं.
शहिदाच्या मुलाला तुम्ही देशद्रोही म्हणता
तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर तरळतोय. माझ्या वडिलांचं पार्थिव तिरंग्यात लपेटलेलं होतं. पार्थिवाच्या पाठी चालत चालत माझा भाऊ इथपर्यंत आला होता. माझ्या शहीद वडिलांचा अपमान संसदेत केला जातो. शहिदाच्या मुलाला तुम्ही देशद्रोही आणि मीर जाफर म्हणता. त्याच्या आईचा अपमान करता. तुमचे केंद्रातील मंत्रीही माझ्या आईचा संसदेत अपमान करतात. ते म्हणतात, राहुल गांधी यांना त्यांचे वडील कोण आहेत हे माहीत नाही. पंतप्रधान म्हणतात ते नेहरू आडनाव का वापरत नाही. तरीही तुमच्यावर खटला भरला जात नाही. तुमची सदस्यता रद्द होत नाही, असा हल्ला त्यांनी चढवला.