PM Narendra Modi : हिंदू सेनेचा जिथे शिव मंदिर असल्याचा दावा, त्याच दर्ग्यावर आज मोदी पाठवणार चादर
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एका दर्ग्यावर चादर पाठवणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच त्या ठिकाणी चादर पाठवणं खास असणार आहे. कारण हिंदू सेनेने त्या ठिकाणी एक शिव मंदिर असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून एक संदेश जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानातील अजमेर शरीफ दर्गा येथे चादर पाठवणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजता ही चादर पाठवली जाणार आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चादर घेऊन अजमेरला जाणार आहेत. 4 जानेवारीला अजमेरच्या दर्ग्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेली ही चादर चढवली जाणार आहे. आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वेळा अजमेर शरीफ दर्गा येथे चादर पाठवली आहे. हे दर्ग्यावर चादर पाठवण्याच 11 वं वर्ष आहे.
अजमेर येथे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा आहे. दर्ग्याला 850 वर्षाचा इतिहास आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जी चादर पाठवण्यात येत आहे, त्याला वेगळं महत्त्व आहे. हिंदू सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ख्वाजा मोइद्दीन चिश्ती अजमेर हा दर्गा नसून हे एक शिव मंदीर असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून चादर पाठवण्याला महत्त्व आहे.
हिंदू सेनेच मत काय?
हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी पाठवलेल्या पत्रात हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चादर पाठवणं योग्य नाही असं म्हटलं आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यानं जर पंतप्रधानांकडून चादर पाठवली तर दबाव निर्माण होईल आणि याचिकेवर परिणाम होईल असं विष्णू गुप्ता यांचं मत आहे. या प्रकरणात अजमेर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
चादर पाठवणं कसलं प्रतीक मानलं जातं?
अजमेरचा ख्वाजा मोइद्दीन चिश्ती दर्गा सगळ्या भारतात प्रसिद्ध आहे. अनेक नामवंत राजकीय नेते, सेलिब्रिटी या दर्ग्याला भेट देऊन ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचं दर्शन घेतात. यावर्षी जानेवारी महिन्यात 813 वा उर्स साजरा होणार आहे. ख्वाजा गरीब नवाज मोइद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर चढवली जाणारी चादर भक्ती आणि सन्मानाची प्रतीक मानली जाते. मार्च 2016 साली वर्ल्ड सुफी फोरमच आयोजन झालं होतं. त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तींच्या शब्दात ईश्वराला सर्वात जास्त कुठली पूजा आवडते, तर ती दीन, दु:खी आणि शोषितांची मदत”