PM Narendra Modi: नरेंद्र मोदी केवळ नेतेच नाही तर समाजसुधारकही; कट्टर विरोधकसुद्धा मान्य करतात त्यांची ‘ही’ खास गोष्ट
विरोधक मोदींच्या प्रत्येक कामाला राजकीय नाट्य जरी म्हणत असले तरी गेल्या 8 वर्षांत त्यांनी अशी अनेक कामं केली आहेत ज्यामुळे त्यांची समाजसुधारक अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यांचे कट्टर आलोचकसुद्धा बंद खोलीत ही गोष्ट कबूल करतात.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय खलबतं सुरू झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सत्तेवरून काढून टाकण्यासाठी सगळे विरोधक एकजुटीने तयारी करत आहेत. मोदी यांचा आज वाढदिवस आहे. नरेंद्र मोदी यांची समाजसुधारक (Social Reformer) म्हणून प्रतिमा उभी करण्यासाठी भाजप (BJP) आणि संघ परिवार आटोकाट प्रयत्न करत आहेत. विरोधक मोदींच्या प्रत्येक कामाला राजकीय नाट्य जरी म्हणत असले तरी गेल्या 8 वर्षांत त्यांनी अशी अनेक कामं केली आहेत ज्यामुळे त्यांची समाजसुधारक म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यांचे कट्टर आलोचकसुद्धा बंद खोलीत ही गोष्ट मान्य करतात. यात स्वच्छ भारत अभियान, शौचालय बांधणी, बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम, तिहेरी तलाकविरोधी कायदा यांचा समावेश होतो. सत्तेवर आल्यापासून त्यांनी घेतलेले मोठे निर्णय आणि केलेली कामं कोणती, याचा आढावा घेऊयात..
स्वच्छ भारत आंदोलन
2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर लाल किल्ल्यावरून दिलेल्या पहिल्याच भाषणात मोदींनी देशाला कचरामुक्त करण्याचा संकल्प घेतला होता. देशात पसरलेली अस्वच्छता ही राष्ट्रीय शरमेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. “आम्हाला पर्यटनाला चालना द्यायची आहे. पर्यटनामुळे गरीबातील गरीब लोकांना रोजगार मिळतो. हरभरा विकणाराही कमावतो, रिक्षावालाही कमावतो, पकोडे विकणाराही कमावतो आणि चहा विकणाराही कमावतो. मात्र पर्यटनाला चालना देण्यात आणि देशाची प्रतिमा सुधारण्यात आपल्यासमोरील सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणारी अस्वच्छता. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आपल्याला घाणीत जगायचं आहे का? सत्तेवर आल्यानंतर मी स्वच्छतेचं पहिलं काम सुरू केलं आहे. लोकांना प्रश्न पडला की हे पंतप्रधानांचं काम आहे का? पण माझ्यासाठी ते खूप मोठं काम आहे. आपला देश स्वच्छ असू शकत नाही का? 125 कोटी देशवासीयांनी ठरवलं की मी कधीही घाण करणार नाही, तर जगातील कोणतीही शक्ती आपलं शहर आणि गाव घाण करू शकत नाही,” असं मोदी म्हणाले होते.
झाडू मारून अभियानाची केली सुरुवात
त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांनी स्वतः दिल्लीतील वाल्मिकी मंदिराजवळील पोलीस चौकी झाडून या मोहिमेची सुरुवात केली होती. त्यानंतर देशात स्वच्छता मोहिमेला वेग आला. देशातील अनेक बड्या व्यक्ती विविध प्रसंगी रस्त्यावरील कचरा साफ करताना दिसले. अलिकडेच प्रगती मैदानाजवळ उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांनी स्वतः कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकला. त्यामुळे देशात स्वच्छतेचं एक वेगळंच महत्त्व निर्माण झालं. मात्र विरोधी पक्षाकडून याला राजकीय नाट्य किंवा लोकप्रियता मिळवण्याची केलेली खेळी असं म्हटलं गेलं. मात्र मोदींच्या या उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या मनात स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण झाली.
बेटी बचाओ, बेटी पढाओ
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा हा महिला सक्षमीकरणाचा पाया आहे. स्त्री भ्रूणहत्या थांबवणं आणि स्त्री शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन ही मोहीम राबवण्यात आली. मोदींनी 2015 मध्ये हरयाणाच्या अशा भागातून या मोहिमेची सुरुवात केली होती, जिथे मुलींची संख्या ही मुलांपेक्षा खूपच कमी होती. या मोहिमेनंतर भ्रूणहत्येच्या घटना कमी झाल्या आणि मुलींबद्दल लोकांची विचारसरणी बदलल्याचं पहायला मिळालं. 22 जानेवारी 2015 रोजी हरयाणातील पानिपत इथून या मोहिमेची सुरुवात झाली. नंतर मोदींनी दत्तक घेतलेल्या जयपूरमधील नागरिकांना सांगितलं, “मुलगा आणि मुलगी समान आहेत. चला मुलींचा जन्म साजरा करूयात. आपल्याला मुलांइतकाच अभिमान मुलींचाही असायला हवा. मी तुम्हाला तुमच्या मुलीच्या वाढदिवशी पाच झाडं लावण्याची विनंती करतो.” या उपक्रमामुळे मोदींची प्रतिमा समाजसुधारकाची झाली.
शौचालय बांधणीचं काम
आधुनिक भारताच्या नावाखाली देशात शौचालयं बांधल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर अनेकदा टीका केली जाते. मात्र स्वच्छ भारत मोहिमेचाच हा एक महत्त्वाचा भाग आहे. शौचालयाला महिलांच्या सन्मानाशी जोडणं हे मोदींचं सर्वात मोठं पाऊल होतं. त्यामुळे त्यांच्या पुढाकाराने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांना ‘इज्जत घर’ असं नाव देण्यात आलं आहे. ज्या महिलांच्या घरात शौचालय नाही, त्यांच्या वेदना मोदींनी अनेक प्रसंगी बोलून दाखवल्या. त्यांनी 2014 च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात शौचालयांच्या गरजेबद्दल सांगितलं होतं. “गावातील गरीब महिला यासाठी रात्र होण्याची वाट पाहत असतात. अंधार पडेपर्यंत ते शौचासाठी बाहेर पडू शकत नाहीत. आपल्या आई-बहिणींच्या सन्मानासाठी आपण शौचालयाची व्यवस्था करू शकत नाही का,” असा सवाल त्यांनी केला होता. यामुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत गेल्या आठ वर्षांत 11 कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यांना इज्जत घर असं नाव देण्यात आलं आहे.
तिहेरी तलाक कायदा
मुस्लिम समाजात शतकांपासून सुरू असलेल्या तलाक-ए-बिद्दतची प्रथा थांबवण्यासाठी मोदींच्या पुढाकाराने तिहेरी तलाक देणाऱ्यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाचा कायदा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे घडलं. या कायद्याला मुस्लिम समाजातून तीव्र विरोध झाला. मुस्लिम धर्मीय संघटनांनी याविरोधात आवाज उठवला. मात्र मुस्लिम महिला संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मुस्लिम समाजसुधारणेच्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे, असं त्यांचं मत आहे. कायदा लागू झाल्यानंतर तिहेरी तलाकच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं पहायला मिळालं. भाजप प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा मांडताना दिसतो. तिहेरी तलाकविरोधात कायदा केल्यानंतर मुस्लिम महिलांची मोठ्या प्रमाणात मतं भाजपला मिळत आहेत, असा दावा भाजपकडून केला जात आहे. मतांचा मुद्दा बाजूला ठेवला तर मुस्लिम समाज सुधारण्याच्या दिशेने हा कायदा मैलाचा दगड ठरणार, हे मात्र खरं.
मोदींना समाजसुधारक म्हणून प्रस्थापित करण्याचा भाजपचा प्रयत्न
नरेंद्र मोदींकडे केवळ पंतप्रधान म्हणून नाही तर एक समाजसुधारक म्हणूनही पाहण्याची गरज आहे, असं भाजप आणि संघ परिवाराचं मत आहे. भाजपने आपल्या स्थापना दिवसापासून म्हणजेच 6 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान सामाजिक न्याय पंधरवडा साजरा करण्यास सुरुवात केली. 11 एप्रिल रोजी ज्योतिबा फुले आणि 14 एप्रिल रोजी संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती येते. मोदींना ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भाजपने या दोन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन मोदींनी गेली आठ वर्षे सातत्याने महिलांचं सक्षमीकरण आणि मागासलेल्या वर्गासाठी काम केलं, हे प्रस्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आला.
यावेळी भाजप मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले होते की, “जसं महात्मा ज्योतिबा फुले हे समाजसुधारक होते, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हेदेखील केवळ राजकारणी नाहीत असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. एखाद्या समाजसुधारकाप्रमाणे ते दिवसरात्र अथक परिश्रम करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्याचं काम नरेंद्र मोदींचं सरकार करत आहे,” असंही ते म्हणाले. उज्ज्वला योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, पोषण अभियान, मुद्रा योजना आणि केंद्र सरकारच्या इतर महत्त्वाकांक्षी उपक्रमांमुळे महिला आणि समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या लोकांचं सक्षमीकरण झाल्याचा भाजपकडून सातत्याने प्रचार केला जात आहे.
नेतान्याहू यांनीसुद्धा मोदींना म्हटलं होतं ‘क्रांतिकारक’
2018 मध्ये भारत दौऱ्यावर आलेले इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रांतिकारी नेता म्हटलं होतं. “तुम्ही क्रांतिकारी नेते आहात आणि भारतात क्रांती घडवत आहात. तुम्ही या अद्भुत देशाला भविष्यासाठी तयार करत आहात,” असं ते म्हणाले होते. प्रस्थापित व्यवस्था मोडून काढण्याच्या मोदींच्या प्रयत्नांमुळे नेतान्याहू नक्कीच प्रभावित झाले होते. त्यांनी केलेल्या या स्तुतीला उत्तर देताना मोदी म्हणाले होते, “माझ्याबद्दल असा समज आहे की माझ्यात संयम नाही. मला लवकर निकाल हवे असतात आणि तुम्हीसुद्धा हीच बाब समजता.” जेव्हा इतर देशांचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष मोदींच्या कार्याची मोकळ्या मनाने प्रशंसा करतात, तेव्हा ते या देशात मोठ्या बदलांचे माध्यम बनत असल्याची धारणा अधिक दृढ होते.