सनबर्न फेस्टिव्हल नकोच… गोव्यातील वातावरण तापलं; स्थानिक लोक उतरले रस्त्यावर
गोव्यात डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या सनबर्न फेस्टिव्हलला जोरदार विरोध होत आहे. गोव्यातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा फेस्टिव्हल रद्द करावा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री रोहन खाऊंटे यांनी या उत्सवाची पाठराखण करत उत्सवाच्या आयोजनाची परवानगी दिली होती. त्याला गोवेकरांनी कडाडून विरोध केला आहे.
जगातील सर्वात मोठा महोत्सव असलेल्या सनबर्नवरून सध्या गोव्यातील वातावरण तापलं आहे. गोव्यातील स्थानिक लोक, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटना आज रस्त्यावर उतरल्या आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सनबर्न फेस्टिव्हलचं नीती आयोगाच्या बैठकीत समर्थन केल्यानंतर गोव्यातील जनतेच्या संतापाचा भडका उडाला आहे. आज या नागरिकांनी रस्त्यावर उतरून सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात आवाज उठवला. विविध संस्था आणि नागरिकांनी हा फेस्टिव्हल होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. हा फेस्टिव्हल गोव्याच्या संस्कृतीच्या विरोधातील आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
कार्निव्हल, सनबर्न फेस्टिव्हल, शिगमोत्सव आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमुळे गोव्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. 2023-24मध्ये सुमारे 88 लाख पर्यटक गोव्यात आले होते. त्यात 4.14 लाख पर्यटक विदेशी होते, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला विरोधी पक्षाने आणि स्थानिक नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री लोकांच्या भावानांकडे दुर्लक्ष करत असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे. साऊथ गोव्यात सनबर्न होऊच नये, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
ड्रग्स आणि वेश्याव्यवसायाला उत्तेजन
दक्षिण गोव्यात येत्या 28 ते 30 डिसेंबर दरम्यान इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल सनबर्नचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याला स्थानिक नागरिकांनी आज जोरदार विरोध केला. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून या महोत्सवाला विरोध केला आहे. यावेळी स्वयंसेवी संस्थाही रस्त्यावर उतरल्या होत्या. आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. सनबर्न फेस्टिव्हल.चं गोव्यात आयोजन करू नये, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच प्रशासनाच्या विविध विभागांना आम्ही मेमोरंडम दिलं आहे.
सनबर्नच्या नावाने इलिगल गोष्टी सुरू असतात. ड्रग्स आणि वेश्याव्यवसाय सुरू असतो. त्यामुळे गोवा बदनाम होत आहे. आम्ही गावांमध्ये ड्रग्सच अजिबात घुसू देणार नाही, असा इशाराच स्थानिकांनी दिला आहे. सर्व नेते आणि स्वयंसेवी संस्थांनीही या महोत्सवाला आक्षेप घेतला आहे.
जनतेच्या बाजूने या असं सर्व आमदार आणि राजकीय नेत्यांनी यावं. आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. सनबर्न गोव्यात नको आहे. हा फेस्टिव्हल लोकांना त्रास देणारा आहे. आमच्या कल्चरला धक्का बसणार आहे, असं स्थानिक आंदोलकांनी म्हटलं आहे.
ध्वनी प्रदूषण वाढले
मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. अगोंडा, चिकालिम, वास्को आणि वर्का ग्रामसभेतील नागरिकांनी सनबर्नमुळे ध्वनी प्रदूषण, रोजच्या कामकाजात येणारे अडथळे आणि पर्यावरणाची हानी होत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही सनबर्न महोत्सवाच्या विरोधात मतदान केलं आहे. आम्ही या उत्सवाविरोधा आंदोलनही केलं आहे, असं सांगतानाच गोव्यात सनबर्नचं आयोजन करणार नाही असं सनबर्नच्या आयोजकांनी गेल्या वर्षीच सांगितलं होतं. तरीही आयोजनाचा घाट का घातला जात आहे? असा सवाल स्थानिकांनी केला आहे.
सांस्कृतिक महोत्सवात बसवू नका
आम आदमी पार्टीचे राज्य प्रमुख अमित पालेकर यांनीही मुख्यमंत्री सावंत यांच्यावर टीका केली आहे. सनबर्नला शिग्मोसारख्या सांस्कृतिक महोत्सवात बसवणं हा गोव्यातील जनतेचा अपमान आहे. आम्ही हा अपमान सहन करणार नाही. सरकारने जनतेच्या भावनांचा विचार केला पाहिजे. राज्याला बदनाम होण्यापासून वाचवलं पाहिजे, असं आवाहन अमित पालेकर यांनी केलं आहे.
हा तर ‘ड्रग्स फेस्टिव्हल’
काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनीही या महोत्सवाला विरोध केला आहे. हा सनबर्न एक प्रकारचा ‘ड्रग्स फेस्टिव्हल’ आहे. गोव्यात अशा फेस्टिव्हलवर बहिष्कार टाकला पाहिजे, अशी मागणी सुनील कवठणकर यांनी केली आहे. संगीत, खाद्यपदार्थ आणि दिलदार स्वभावामुळे गोवा जगभर प्रसिद्ध आहे. इलेक्ट्रिक डान्स म्युझिक आणि कर्णकर्कश आवाजामुळे प्रसिद्ध नाही, असंही कवठणकर म्हणाले.