भाजप लोकसभेच्या किती जागा जिंकणार, एनडीए किती जिंकणार; मोदी यांनी संसदेतच सांगितला आकडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत जोरदार भाषण केलं. आपल्या भाषणातून मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवला. महागाईपासून ते घराणेशाहीच्या मुद्द्यांवरून त्यांनी काँग्रेसला घेरलं. ओबीसींच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर येत्या लोकसभेत लोक भाजपला किती जागा देतील? एनडीएला किती जागा देतील? याची माहितीच मोदी यांनी लोकसभेत दिली.
नवी दिल्ली | 5 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए किती जागा जिंकेल यांची माहिती दिली आहे. संपूर्ण देशात अबकी बार मोदी सरकारचा नारा घुमत आहे. मी साधारणपणे आकड्यांच्या खेळात पडत नाही. पण मी देशाचा मूड पाहतोय. यावेळी एनडीए 400 हून अधिक जागा जिंकेल. तर भाजप 370 जागा जिंकेल, असा दावा करतानाच आमचा पुढील कार्यकाळ देशाच्या 100 हजार वर्षांची पायाभरणी करणारा असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. खासदारांच्या ताकदीमुळेच आपण 370 कलम रद्द केलं. आपण 370 कलम रद्द होताना पाहिलं. अंतराळापासून ऑलिम्पिकपर्यंत नारी शक्तीची ताकद वाढली आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रखडलेल्या योजनाही निर्धारित वेळेत पूर्ण होताना पाहिल्या आहेत. आम्ही इंग्रजांचे जाचक आणि आऊटडेटेड कायदे हटवून न्याय संहिता अधिक मजबूत केली आहे. काही कामाचे नव्हते असे शेकडो कायदे आम्ही रद्द केले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तिसऱ्या कार्यकाळाला, फक्त…
भारताच्या महान परंपरेला ऊर्जा देणारं मंदिर देशात निर्माण झालं आहे. त्यामुळे आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाहीये. फार फार 100 ते 125 दिवस बाकी आहेत. संपूर्ण देशात आतापासूनच ‘अब की बार मोदी सरकारचा नारा’ घुमू लागला आहे. भाजपच्या 370 तर एनडीएला 400 जागा लोक देतीलच, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
ओबीसीच्या मुद्द्यावरून हल्ला
काँग्रेसवाले ओबीसींवरून खूप चिंतेत आहेत. सरकारमध्ये किती ओबीसी आहेत याचा ते हिशोब मागत आहेत. मला आश्चर्य वाटतं. त्यांना मी दिसत नाहीये का? सर्वात मोठा ओबीसी दिसत नाही का? माझ्यासारखे ओबीसी काँग्रेसला दिसत नाही? त्यांच्या संस्थेत किती ओबीसी होते? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला विचारला.
महागाईवर नियंत्रण…
यावेळी पंतप्रओधान नरेंद्र मोदी यांनी महागाईवर नियंत्रण ठेवल्याचा दावा केला. आमच्या सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवलं आहे. दोन दोन युद्ध झाल्यावरही आमच्या सरकारने महागाई रोखून धरली. पूर्वी सभागृहाचा पूर्णवेळ घोटाळ्यांवरील चर्चांमध्ये जात होता. 1974 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांनी प्रत्येक ठिकाणी टाळे लावले होते. देशात 30 टक्के महागाई होती. जमीन नसेल तर रोप लावण्याच्या भांड्यात भाज्या उगवा, असं सांगितलं जात होतं. देशात महागाई एवढी वाढली होती की त्यावरील गाणीही लोकप्रिय ठरली आहेत. ही दोन्ही गाणी काँग्रेसच्या सत्ता काळात आली होती, अशी टीका त्यांनी केली.