WITT: देशातील 28 सर्वोत्तम फुटबॉलपटूंसोबत पंतप्रधान मोदींनी घेतला फोटो, ‘टीव्ही 9’ चं केलं कौतुक
टीव्ही 9 नेटवर्कनं ग्लोबल फुटबॉल हंटचे आयोजन केलं होतं. 11 फेब्रुवारी रोजी या उपक्रमाला सुरुवात झाली. देशातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंचा शोध घेणं हा या उपक्रमाचा उद्देश होता.

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. भारत मंडपममध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या ऐतिहासिक फुटबॉल टॅलेंट हंट इव्हेंट ‘इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस’ मध्ये निवड झालेल्या देशातील टॉप 28 फुटबॉल खेळाडूंसोबत संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तरुणांसोबत फोटो देखील काढला. यावेळी मोदी यांनी टीव्ही 9 चं कौतुक देखील केलं.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, हे माझं नशीब आहे की मला अशा स्टार खेळाडूंसोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. तुम्ही हा कार्यक्रम मीडिया हाऊसच्या फायद्यासाठी नाही तर देशाच्या फायद्यासाठी आयोजित केला आहे. 2047 मध्ये जेव्हा भारत विकसीत राष्ट्र बनेल तेव्हा ही मुलं त्यांच्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर असतील की विकसीत भारताचा सर्वाधिक फायदा त्यांना होईल. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा असं या फुटबॉल खेळाडूंसोबत संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
टीव्ही 9 नेटवर्कनं ग्लोबल फुटबॉल हंटचे आयोजन केलं होतं. 11 फेब्रुवारी रोजी या उपक्रमाला सुरुवात झाली. देशातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंचा शोध घेणं हा या उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमाला संपूर्ण देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला प्रादेशिक पातळीवर खेळाडूंची चाचणी पार पडली. त्यातून खेळाडू निवडण्यात आले.
या उपक्रमासाठी तब्बल 50 हजार खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यातील दहा हजार जणांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये सात हजार मुलांचा तर तीन हजार मुलींचा समावेश होता. आता यामधील 28 सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, या खेळाडूंसोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. आता या खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये सर्वोत्तम युरोपियन प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे.