Parliament Attack | संसदेतील घुसखोरीप्रकरण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया काय
Parliament Attack | 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेत देशातील काही तरुणांनी घुसखोरी केली. त्यांनी सुरक्षा व्यवस्था भेदत लोकसभेच्या सभागृहात स्मोक क्रॅकर्सचा वापर केला. विरोधकांनी याप्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यासाठी गोंधळ घातला. याप्रकरणात दोघांनी सभागृहाबाहेर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले पंतप्रधान..
नवी दिल्ली | 17 डिसेंबर 2023 : 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेतील घटनेने देशात चिंतेचे वातावरण पसरले. देशाच्या विविध भागातील काही तरुणांनी संसदेत घुसखोरी केली. स्मोक क्रॅकर्सचा वापर केला. तानाशाहीविरोधात घोषणा दिल्या. एका तरुणाचा तर संसद परिसरात जाळून घेण्याचा मनसूबा पण समोर आला. याप्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात उत्तर द्यावे यासाठी विरोधकांनी गोंधळ घातला. दोघांनी सभागृहाबाहेर प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणावर काय म्हणाले पंतप्रधान?
एकूण घटना चिंताजनक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संसद परिसरातील घटना चिंताजनक आहे. या घटनेची सखोल चौकशीची गरज आहे. त्यामुळे तपास यंत्रणा या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तसेच अशा घटनांवर वाद-विवादापासून दूर राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी याविषयावर मत व्यक्त केले.
काय म्हणाले पंतप्रधान?
एक वृत्तपत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली. ” संसदेत जी घटना घडली. ही घटना हलक्यात घेऊ नका. त्यामुळेच लोकसभेचे अध्यक्ष ही गांभीर्याने याविषयीचे ठोस पाऊल टाकत आहेत. तपास यंत्रणा कठोरतेने तपास करत आहे. या घटनेमागे कोण आहे, त्यांचे मनसुबे काय आहे. याची सखोल चौकशी गरजेची आहे. अशा विषयावर वाद-विवाद टाळणे हितकारक आहे. अशा मुद्यांवर समाधानकारक मार्ग शोधणे आवश्यक आहे.”
विरोधकांची मागणी काय
संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत घोडचूक झाली आहे. भाजप खासदाराच्या ओळखपत्रावर तरुण संसद परिसरात घुसले. त्यांनी काय केले हे उभ्या जगाने पाहिले. त्यांनी हा प्रकार का केला. त्याच्या मागे कोण आहे. सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यसभा आणि लोकसभेत सरकारची बाजू स्पष्ट करावी. या मुद्यावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. याप्रकरणी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहातील सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.