Reena Chibbar | मूळ घरानं त्यांना पाकिस्तानात ओढून नेलं… पुण्यातल्या 90 वर्षांच्या आजी रावळपिंडीत, पाकिस्तानी मीडियात तुफ्फान व्हायरल!
रीना छिब्बर आज 90 वर्षांच्या आहेत. 1946 मध्ये रावळपिंडीतून स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांनी पुण्यात वास्तव्य केलं.
पुणेः पाकिस्तानी माध्यमांमध्ये एका पुण्याच्या आजींची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आजींच्या दिसण्यापासून ते रावळपिंडीतल्या (Rawalpindi) घराला भेट देण्यावरून त्यांची तारीफ केली जातेय. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी रीना छिब्बर (Reena Chibbar) या पाकिस्तानातून भारतात आल्या. 1946 च्या फाळणीत आपली माती, गावच नाही तर देश सोडण्याचं दुःख अनेकांनी झेललं. दोन देशांमधला द्वेष वाढत गेला तसं स्थलांतरीतांनी मनातल्या आठवणी तशाच रेटल्या. काहींना अजूनही मूळ मातीची ओढ खेचून नेते. पाकिस्तानचे (Pakistan) काही नागरिक भारतात पाळं-मूळं शोधण्यासाठी येतात तसे भारतातले लोकही पाकिस्तानात आपला इतिहास शोधायला जातात. पुण्यातल्या रीना झिब्बर या आजीदेखील आपल्या आठवणी जिवंत करण्यासाठी नुकत्याच रावळपिंडीत गेल्या. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानात जाण्याचा योग त्यांनी जुळवून आणला. रावळपिंडीतल्या घराला भेट दिल्यानंतर आजींनी अनेक आठवणींना उजाळा दिला….
घरापर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं…
पाकिस्तानातील घरापर्यंत पोहोचण्याचा रीना वर्मा छिब्बर यांचा प्रवास सोपा नव्हता. यापूर्वी त्यांनी अनेकदा मूळ घरी जाण्यासाठी प्रयत्न केले. पण पाकिस्तान उच्चायुक्तालयातून परवानगी मिळाली नाही. 1965 मध्येही असाच अर्ज केला होता. तोही अपयशी ठरला होता. रीना यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट टाकली. आपलं वडिलोपार्जित घर पाहण्याची तळमळ व्यक्त केली. ही पोस्ट पाहून पाकिस्तानी नागरिक सज्जाद हैदर यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी व्हिसा प्रक्रियेत मदत केली. आणि अखेर रीना यांना तीन महिन्यांचा व्हिसा मिळाला. पाकिस्तान सोडल्यानंतर तब्बल 75 वर्षांनी रीना वर्मा 20 जुलै रोजी रावळपिंडीतल्या घरी पोहोचल्या…
Ninety-two-year-old Indian woman Reena Verma Chibbar, who has reached Pakistan on a three-month visit visa, was overjoyed when she reached her ancestral home in Prem Niwas Mahalla, situated on DAV College Road, Rawalpindi after 75 years.
Visit: https://t.co/NaVpNnkrIB#etribune pic.twitter.com/Hxr5wLja0G
— The Express Tribune (@etribune) July 20, 2022
रावळपिंडीत धुम-धडाक्यात स्वागत
रीना छिब्बर यांनी पाकिस्तान सोडलं तेव्हा त्या फक्त 15 वर्षांच्या होत्या. पण तिथलं घर, त्या भिंती, त्या वेळची माणसं त्यांना स्पष्ट आठवतात. याच आठवणी घेऊन त्या रावळपिंडीत पोहोचल्या. तिथल्या लोकांनीही ढोल-ताशांच्या गजरात रीना यांचं स्वागत केलं. आपल्या देशातील पंजामधील लुधियानातील एक स्थलांतरीत मुस्लिम कुटुंब तिथं राहतं. या कुटुंबियांत रीना छिब्बर काही काळ रमल्या. 75 वर्षांपूर्वी आई-वडील आणि पाच भावंडांसोबतच्या आठवणींनी उजाळा दिला. घर तिथल्या तिथेच होतं पण त्यावेळची माझी माणसं नाहीत, असं म्हणत रीना भावूक झाल्या. रावळपिंडीतली प्रेम गल्ली हे नाव त्यांचे वडील प्रेमचंद छिब्बर यांच्या नावामुळेच देण्यात आले आहे, असेही रीना यांनी सांगितले.
पाकिस्तानी माध्यमांतून तुफ्फान फेमस
पाकिस्तानी माध्यमांमध्ये रीना छिब्बर चांगल्याच लोकप्रिय झाल्या. तिथले चॅनल पीटीव्ही न्यूजने रीना छिब्बर यांची मुलाखत घेतली. त्यांची ओळख करून देताच अँकरने त्या खूप छान दिसतात असे म्हटले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रीना छिब्बर म्हणाल्या, आपलं बालपण जिथं जातं, तिथल्या आठवणी कधीही विसरत नाहीत. रावळपिंडी माझ्या मनात घर करून बसलेलंय. अवघं आयुष्य भारतात गेलं. पण या शहराच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.
रीना छिब्बर 90 वर्षांच्या
रीना छिब्बर आज 90 वर्षांच्या आहेत. 1946 मध्ये रावळपिंडीतून स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांनी पुण्यात वास्तव्य केलं. पुण्यात देवी कॉलेज रोडवर त्यांचं घर आहे. मॉडर्न स्कूलमधून त्यांचं शिक्षण झाल्याची माहिती समोर आली आहे.