एक व्यक्ती 69 CCTV कॅमेरे, जेलमध्ये त्याच्या आजूबाजूलाही कुणी भटकू शकणार नाही….
अमृतपालला डिब्रूगड येथील इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आलेले नाही. त्याला आयसोलेशन वॉर्डात ठेवलं गेलंय.
नवी दिल्ली : 18 मार्च 2023 ते 23 एप्रिल 2023. तब्बल 36 दिवस पंजाब पोलीस, तपास यंत्रणांना गुंगार देत फरार झालेला अमृतपाल सिंह सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळीद्वारे दहशतवादी कारवाया करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. महिनाभरापासून जास्त दिवस तो लपून होता. स्वतःला भिंद्रनवाले पार्ट 2 समजत होता. मात्र रविवारी तो शरण आला. आसाममधील डिब्रूगड येथे अमृतपाल सिंह याची रवानगी करण्यात आली आहे. अमृतपाल सिंह जेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिथली सुरक्षा व्यवस्था प्रचंड वाढवण्यात आली. सुरक्षेच्या निकषांमध्ये येथील जेल अत्यंत उत्कृष्ट मानला जातो. मात्र अमृतपालला इथे ठेवण्याचा निर्णय झाल्यावर सुरक्षा व्यवस्था आणखीच वाढवण्यात आली. रविवारी सकाळी पंजाब राज्यातील मोगा येथून अमृतपालला अटक करण्यात आली.
69 सीसीटीव्हीची नजर
आसाम येथील डिब्रूगड जेलमध्ये यापूर्वीच खलिस्तानींना पाठवण्यात आलंय. हे सर्व अमृतपालचे साथीदार होते. पंजाबमध्ये गन आणि गँगस्टर कल्चरचं जाळं आहे. अनेक गँगस्टर जेलमधूनच आपली गँग चालवतात, असं म्हटलं जातं. त्यामुळेच अमृतपालला कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या जेलमध्ये पाठवण्यात आलंय. माध्यमांतील वृत्तानुसार, अमृतपाल येण्यापूर्वी येथील जेलमध्ये ५७ सीसीटीव्ही कॅमेरे होते. मात्र आता त्यांची संख्या 12 ने वाढवण्यात आली आहे. येथील सुरक्षा रक्षकांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
जेलचा रेकॉर्ड काय?
अमृतपालला डिब्रूगड येथील इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आलेले नाही. त्याला आयसोलेशन वॉर्डात ठेवलं गेलंय. डिब्रूगड जेलमध्ये उल्फा अतिरेक्यांना ठेवण्यात आलं होतं. अशा प्रकारच्या गुन्हेगारांचे सर्व डावपेच येथील अधिकाऱ्यांना पक्के माहिती आहेत. १८५९ मध्ये या जेलची निर्मिती झाली. हे अत्यंत सुरक्षित आहे. अनेक ठिकाणचे जेल शहराच्या बाह्य भागात असतात. मात्र डिब्रूगडचा तुरुंग शहरातच आहे. तसेच येथून कुणी पळून गेल्याचा रेकॉर्डदेखील नाही.
अमृतपालवर NSA अंतर्गत कारवाई करण्यात आली. पाकिस्तानची दहशतवादी संघटना आयएसआयच्या मदतीने पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आलाय. आर्म्स अॅक्टअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. अमृतपालच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यावर हल्ला करून ज्या प्रकारे एका साथीदाराची सुटका करून घेतली, यावरूनदेखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.