राहुल गांधी यांनी दलित तरुणीशी लग्न करावं; रामदास आठवले यांचं आवाहन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अकोला आणि वाशिममध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी स्वच्छतेचं अभियान राबवलं. प्रत्येक बुद्ध मंदिर स्वच्छ झालं पाहिजे, बुद्ध विहारात साफसफाई असली पाहिजे, यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी स्वच्छ बुद्ध विहार या मोहिमेला वाशिममधून सुरुवात केली आहे.
अकोला | 15 जानेवारी 2024 : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलं आहे. आठवले यांनी भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी दलित तरुणीशी लग्न करावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. तसेच प्रकाश आंबेडकर हे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये आल्यास मी त्यांना माझं मंत्रिपदही द्यायला तयार आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे. अकोल्यात पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
प्रकाश आंबेडकर एनडीए आघाडीत आल्यास माझे मंत्रिपद त्यांना देण्यास तयार आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात रिपब्लिकन पक्षातील सर्व घटकांनी एकत्रित यावे, त्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या तिन्ही भावांचे जे वेगवेगळे पक्ष आहेत, त्यांनी सर्वप्रथम आपल्या तीन भावाना एकत्रित आणावे आणि रिपब्लिकन आघाडीचे नेतृत्व करावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. राहुल गांधी सध्या एकटे असून त्यांना साथीदाराची गरज आहे. दलित समाजात अनेक उच्चशिक्षित मुली असून त्यांनी दलित समाजातील मुलीशी लग्न करावे, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे.
भुजबळ आणि जरांगे यांना समजावणार
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र त्यांना ओबीसीमधून आरक्षण न देता वेगळा प्रवर्ग बनवून आरक्षण द्यावं. त्यांना 15 टक्के आरक्षण देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज बहुजन समाज आहेत आणि त्यामुळे या दोन्ही समाजात भांडण लावण्याचे काम होऊ नये यासाठी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांनाही भेटून समजवणार असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसवर बहिष्कार टाका
सध्या बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या जागेवर यापूर्वी बौद्ध मंदिर होते, असा मोठा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. राम मंदिर, बाबरी मशीदप्रमाणेच तिथे बौद्ध मंदिर व्हावे यासाठीही प्रयत्न करणार आहे. तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्यालाही निमंत्रण असून मीही कार्यक्रमाला जाणार आहे. मुस्लिम समाजानेही राम मंदिराच्या बाबतीतला निर्णय शांततेने स्विकारलेला आहे. मात्र काँग्रेसने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे काँग्रेसने जसा या सोहळ्यावर बहिष्कार टाकलाय, तसाच सर्व हिंदू समाजाने सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसवर बहिष्कार टाकावा, असं आवाहन रामदास आठवले यांनीकेले
स्वच्छ बुद्ध विहार अभियानास सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतरामदास आठवले यांनी स्वच्छ बुद्ध विहार या उपक्रमाचा वाशिमच्या आनंद बुद्ध विहारमधून प्रारंभ केला. यावेळी बुद्ध विहारातील स्मृती स्तंभाजवळील कचऱ्याची त्यांनी विल्हेवाट लावली. प्रत्येकाच्या निरोगी आरोग्यासाठी जीवनात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येकानं वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक क्षेत्रात स्वच्छता राखली पाहीजे, असं आवाहन आठवले यांनी केलं. वाशिममधून सुरू झालेली स्वच्छ बुद्ध विहार ही मोहीम संपूर्ण देशात राबविणार असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं.