हिमाचल, पंजाबमध्ये ढगफुटी… घरे पाण्यात, आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू; लोकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर

| Updated on: Jul 12, 2023 | 9:52 AM

हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पावसाचा प्रचंड कहर सुरू आहे. दोन्ही राज्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे हिमाचलमध्ये आतापर्यंत 80 तर पंजाबमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल, पंजाबमध्ये ढगफुटी... घरे पाण्यात, आतापर्यंत 90 जणांचा मृत्यू; लोकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर
Torrential rain
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिमला : हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये ढगफुटी झाली आहे. या दोन्ही राज्यात पावसाने नुसता कहर केला आहे. पावसाचा सर्वाधिक कहर हिमाचल प्रदेशात झाला आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या भयानक पावसामुळे आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो घरे पाण्यात गेली आहे. अनेकांना विस्थापित व्हावे लागले आहे. अनेकांचे स्थलांतर केले आहे. तर एअर लिफ्टद्वारे अनेकांचे जीव वाचवले जात आहे. शिमला नालागड रोड भूस्खलनामुळे गेल्या तीन दिवसांपासून बंद पडला आहे. तिच परिस्थिती पंजाबमध्येही आहे. पंजाबमध्येही पावसाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमालच प्रदेशात आतापर्यंत पावसाने 80 जणांचा बळी घेतला आहे. यात रस्ते अपघातात झालेल्या मृतांचाही समावेश आहे. तसेच आतापर्यंत पावसामुळे 470 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पावासामुळे आतापर्यंत 100 घरे जमीनदोस्त झाली आहेत. तर 350 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. पावसामुळे दहा लोक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध लागत नसल्याचं कार्यकारी पोलीस महासंचालक सतवंत अटवाल यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पावासमुळे 900 लोक अडकून पडले आहेत. चंद्रताल येथे लष्कराच्या हेलिकॉप्टरने पाच आजारी आणि बुजर्गांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. चंद्रतालमध्ये आतापर्यंत 350 लोक अडकले आहेत. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 1050 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र, हा सरकारी आकडा असून प्रत्यक्षात चार हजार कोटींचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.

भयंकर नुकसान

राज्यात पावसामुळे जागोजागी भूस्खलन होत आहे. भूस्खलनामुळे आतापर्यंत रस्ते बंद करण्यात आले आहेत. 2577 ट्रान्सफार्मर खराब झाले आहेत. शेकडो गावात वीज नाहीये. 1418 पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा पुरवठा होत नाहीये. वाहतूक, वीज आणि फोन सर्व्हिसही बाधित झाली आहे. राज्यात आठ ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्याने पूर आला आहे.

या जिल्ह्यात पुराचा धोका

शिमला, सिरमौर आणि किनौर आदी जिल्ह्यात मध्यम ते प्रचंड पूर येण्याची शक्यता आहे. तसेच सिरमौर, शिमला, मंडी आणि किन्नौरमध्ये प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या 24 तासात नहान येथे सर्वाधिक 250 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या भागातील विमान सेवा बंद करण्यात आली आहे.

पंजाबमध्येही हाहा:कार

पंजाबमध्येही गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. चंदीगडमध्ये गेल्या 24 तासात 322 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 23 वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असून या पावसामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. चंदीगडमध्ये डेरा बस्सी येथे तर अनेक लोक नावेतून प्रवास करताना दिसत आहेत. पावसामुळे अनेक घरांचं नुकसान झालं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.