दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, अशोक गहलोतांची गत अशी तर होणार नाही?
राजस्थानमध्ये घडलेल्या घटनाक्रमासाठी आपण जबाबदार असून याबद्दल क्षमस्व आहोत, अशी भूमिका अशोक गहलोत यांनी घेतली. पण सचिन पायलट यांच्या सोनिया गांधींशी झालेल्या चर्चेतून गहलोत यांच्यासाठी धोक्याचे संकेत मिळत आहेत का, अशी शंका व्यक्त केली जातेय.
नवी दिल्लीः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळण्याची संधी चालून आली असताना राजस्थानचं मुख्यमंत्री (Rajasthan CM) पदही आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्याचा हट्ट अशोक गहलोत यांना भोवण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यानंतर अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी अध्यक्ष पदाची (Congress President) निवडणूक लढणार नाही, असं स्पष्ट केलंय. तर राज्यातील घटनांसाठी आपण जबाबदार असल्याचंही मान्य केलंय. गहलोत यांच्या माफीने त्यांची पक्षावरील निष्ठा अधिक गडद झाल्याचे म्हटले जातेय. मात्र राजस्थानचं मुख्यमंत्री पदही त्यांना मिळेल की नाही, यावर शंकेचं सावट आहे.
राजस्थानमधील काँग्रेस आमदारांच्या राजीनामा सत्रानंतर अशोक गहलोत यांच्याकडे मुख्यमंत्री पद असेल की नाही, याचा निर्णय 8 ऑक्टोबर नंतर होणार आहे. काँग्रेसकडून काल हा निर्णय जागीर करण्यात आला.
तसेच अशोक गहलोत किंवा सचिन पायलट या दोघांपैकीच एक जण मुख्यमंत्री होईल. तिसऱ्या चेहऱ्याची शक्यता नाही, असेही काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
गुरुवारी रात्री सचिन पायलट यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.
Will not contest Congress president polls, says Ashok Gehlot
Read @ANI story | https://t.co/VmOCstrlmJ#AshokGehlot #CongressPresidentPolls #CongressPresident pic.twitter.com/qxeGj9IkAz
— ANI Digital (@ani_digital) September 29, 2022
तत्पूर्वी 10 जनपथवर अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींना भेटून माफी मागितली. काँग्रेस आमदारांची बैठक होऊ शकली नाही तसेच इतर घटनांसाठी आपण जबाबदार असल्याचं मान्य केलं.
ते म्हणाले, मी 50 वर्षांपासून काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे व्य़थित आहे…
राहुल गांधींनीच अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, अशी विनंती मी केली होती. मात्र त्यांनी स्पष्ट नकार होता, असंही गहलोत यांनी पुन्हा एकदा सांगितलं.
यंदा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मी लढणार नाही, असं राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केलंय. आता अशोक गहलोत या स्पर्धेतून बाजूला झाले. त्यानंतर आता दिग्विजय सिंह आणि शशी थरूर यांच्या नावाची चर्चा आहे.
सिंह आणि थरूर आज निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करतील. अध्यक्ष पदाची निवडणूक 19 ऑक्टोबर रोजी होईल.
दरम्यान, काँग्रेसच्या जी 23 समूहातील चार नेत्यांचीही महत्त्वाची बैठक झाली. यात आनंद शर्मा, भूपेंद्र सिंह हुडा, पृथ्वीराज चव्हाण आणि मनीष तिवारी यांची नावं आहेत. यापैकी मनीष तिवारीदेखील निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे.