भयानक, दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये मोठी दुर्घटना, IAS तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जलसमाधी, लायब्ररीतून काढला तिघांचा मृतदेह
Rau IAS Coaching : दिल्लीत मुसळधार पावसानंतर कोचिंग क्लासच्या तळघरात अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सनदी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न या क्लासच्या हलगर्जीपणामुळे भंगले.
दिल्लीतील धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुसळधार पावसाने दिल्लीत अनेक भागात पाणी शिरले आहे. तर मध्य दिल्लीमधील राजेंद्र नगर परिसरात UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले आहे. राव कोचिंग क्लासच्या तळघरात ग्रंथालय आहे. याठिकाणी पाणी भरले. जवळपास 12 फुट पाणी भरल्याने काही विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. सनदी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न या क्लासच्या हलगर्जीपणामुळे भंगले.
विद्यार्थ्यांचे रस्त्यावर आंदोलन
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर भागातील राव आयएएस स्टडी सेंटरच्या ग्रंथालयात काही विद्यार्थी अभ्यास करण्यात गुंग होते. त्यावेळी अचानक पावसाचे पाणी वाढले. त्यामुळे विद्यार्थ्यांना तळघरातील ग्रंथालयातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू ओढावला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या दलाने तातडीने धाव घेतली. या ठिकाणी 12 फूट पाणी साचले होते.
या घटनेने सनदी अधिकारी होण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी रस्त्यावर धरणे आंदोलन केले. तर आज विद्यार्थी आप सरकारचा निषेध करण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. दरम्यान दिल्ली सरकारने या घटनेचे दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.
3 विद्यार्थ्यांचा मृतदेह मिळाले
मध्य दिल्लीचे डीसीपी एम हर्षवर्धन यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, संध्याकाळी 7 वाजता यंत्रणांना घटनेची माहिती मिळाली. दिल्लीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यावरील पाणी सखल भागात साचले. राजेंद्र नगरमधील युपीएससी कोचिंग क्लासच्या तळघरात पाणी भरल्याचे समोर आले. त्यात काही विद्यार्थी फसल्याचे लक्षात आले. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू ओढावला. इतक्या लवकर तळघर पाण्याने कसे भरले याचा तपास करण्यात येत आहे.
पीएचडीचे स्वप्न पण अपूर्ण
या घटनेत तीन विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. नेविन डाल्विन हा केरळचा विद्यार्थी जवाहरलाल नेहरु विद्यापीठात पीएचडी करत होता आणि सोबतच सनदी अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. तान्या विजय कुमार सोनी, श्रेया राजेंद्र यादव या दोन तरुणींचा यामध्ये मृत्यू ओढावला आहे.