Rishabh Pant | ऋषभ पंत पुन्हा क्रिकेट खेळू शकणार का? अपघातानंतर कुठे कुठे जखमा?
Rishabh Pant Car Accident News | दिल्लीहून रुडकीला जाताना प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला.
नवी दिल्लीः क्रिकेटच्या मैदानावर (Cricket Ground) जखमी झाल्यामुळे आतापर्यंत अनेक खेळाडूंचं करिअर जवळपास संपुष्टात आल्याचा इतिहास आहे. अनेक खेळाडू पीचवर परतले पण त्यांचा खेळ आधीसारखा प्रभावी राहिला नाही. त्यामुळे भारताचा विकेट कीपर (Wicket keeper) ऋषभ पंतचा (Rishabh Pant) एवढा भयंकर अपघात झाल्यानंतर त्याच्या करिअरवर काय परिणाम होईल, हा प्रश्न सर्वांना पडलाय. ऋषभ पंतसुद्धा जिद्दी खेळाडू आहे. तो या संकटावरही मात करेल.
आज शुक्रवारी सकाळी ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून रुडकीला जाताना त्याची कार डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली. त्यानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने ऋषभ पंत या अपघातातून बचावला.
भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड अर्थात BCCI ने जारी केलेल्या वृत्तानुसार, ऋषभ पंतला गुडघा, घोट्याला जखम झाली आहे. विकेट कीपर आणि बॅट्समनसाठी गुडघ्याची जखम होणं थोडं अवघड असतं.
कारण विकेट कीपरला बॅट्समनच्या मागे वारंवार उठावे आणि बसावे लागते. त्यामुळे क्रिकेट सामन्यात ज्यात ऋषभ पंतची मास्टरी आहे, त्यात परफॉर्मन्स करणं आगामी काळात अवघड जाऊ शकतं.
कुठे कुठे जखम?
बीसीसीआयने जारी केलेल्या वृत्तानुसरा, ऋषभ पंतला कपाळ, उजव्या गुडघ्याचे लिगामेंट, उजवे मनगट, घोटा, पंजा, पाठीला जखम झाली आहे. ऋषभ पंतची प्रकृती आता स्थिर आहे.
त्याला डेहराडून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ऋषभ पंतचे एमआरआय केलं जाईल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट सुरु होईल.
लिगामेंटची जखम गंभीर?
लिगामेंट टीयरची जखम साधारणतः खेळाडूंनाच होते. कारण खेळाडूंना मैदानात अशा जखमा होतात. पण ऋषभ पंतला कार अपघातामुळे ही जखम झाली.
लिगामेंटमुळे गुडघ्यांना मजबूत ठेवते. सांधेदुखीत गुडघ्यांना यामुळे आधार मिळतो. पण लिगामेंट टियरला दुखापत झाल्यास हा सांधा त्रास देऊ लागतो. त्यामुळे उभे राहताना, चालताना त्रास होऊ शकतो.
योग्य उपचार केले नाही तर यासाठी ऑपरेशनदेखील करावे लागते. ऋषभ पंतची जखमी किती गंभीर आहे, हे एमआरआयनंतरच कळेल.
ऋषभ पंत एक उत्तम क्रिकेटपटू आहे. बीसीसीआयकडील निष्णात विकेट कीपरपैकी तो एक आहे. त्यामुळे त्याच्यावर ओढवलेलं संकट हे बीसीसीआय समोरदेखील आव्हान आहे.
साऊथ आफ्रिकेचा प्रसिद्ध विकेट कीपर मार्क बाउचरचं करिअरही जखम झाल्यानेच संपुष्टात आलं. बाऊचरच्या डोळ्यावर जखम झाली हो आणि त्यानंतर क्रिकेट पीचवर तो परतलाच नाही. इंग्लंडच्या सायमन जोन्सलाही फील्डिंग करताना गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचं करिअर थांबलं.
लिगामेंट इंज्युरी जास्त असली तर ती भरून निघण्यासाठी खूप कालावधी लागू शकतो. बीसीआयने ऋषभ पंतला प्रत्येक प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलंय. पण २०२३ या नव्या वर्षात ऋषभ पंत या अपघातातून किती सावरू शकतो, हे आगामी काळच ठरवेल.