ऑटो रिक्षातून 14 जणांचा प्रवास, बस अपघातात रिक्षातील सात महिलांचा जागीच मृत्यू; रणरणत्या उन्हातील प्रवास…
आंध्रप्रदेशात काल अत्यंत भीषण अपघात झाला आहे. रिक्षा आणि खासगी बसच्या अपघातात रिक्षातील सात महिलांचा मृत्यू झाला आहे. या रिक्षातून एकूण 14 जण प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी मजूर होते.
काकीनाडा : आंध्रप्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात रविवारी दुपारी अत्यंत भीषण अपघात झाला. ऑटो रिक्षा आणि बस दरम्यान झालेल्या या भीषण अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला. या सातही महिला रिक्षातून प्रवास करत होत्या. धक्कादायक बाब म्हणजे अवघे सात लोक बसण्याची क्षमता असलेल्या या रिक्षातून 14 जण प्रवास करत होते. या अपघातातील सातजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुपारी साडेतीन वाजता तल्लारेवू बायपास रोडवरील राजमार्गावर विरुद्ध दिशाने जात असलेल्या एका भरधाव खासगी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही बस यानमकडे जात होती.
पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघातातून ऑटो रिक्षा चालक बालंबाल वाचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षातून प्रवास करणाऱ्या 14 जणांपैकी सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या रिक्षात सात प्रवासी बसण्याची क्षमता होती. मात्र, या रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेण्यात येत होते. दुपारच्या रणरणत्या उन्हातून दाटीवाटीने रिक्षात बसून हे प्रवासी प्रवास करत होते.
सर्वजण मजूर
हे सर्व प्रवासी मजूर आहेत. हे सर्वजण झिंगा फॉर्ममध्ये काम करत होते. या अपघातात सातजण गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने या जखमींना काकीनाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. तसेच या अपघातातील वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. दरम्यान या मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.
दोघांचेही कंट्रोल सुटले
अपघातानंतर पोलिसांनी मृतकांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती दिली आहे. त्यानंतर या मृतांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. ही रिक्षा प्रवाशांनी खच्चून भरलेली होती. बस आणि रिक्षा दोघांचंही कंट्रोल सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातानंतर सर्वात आधी परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी येऊन तातडीने मदत कार्याला सुरुवात केली.