औरंगजेबच्या कबरीबाबत राज ठाकरेंच्या मागणीनंतर संघांची भूमिका आली समोर
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाची कबर बांधून आदर्श घालून दिला होता. यावरून भारताची औदार्य आणि सर्वसमावेशकता दिसून येते. औरंगजेबची कबर राहील आणि ज्यांना ती पाहण्याची इच्छा असेल ते जाऊन पाहू शकतात.

महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवरुन सध्या राजकारण सुरु आहे. औरंगजेबची कबर काढण्याची मागणी काही जण करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणी गुढीपाडावा मेळाव्यात वेगळी भूमिका मांडली. औरंगजेबची सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी फक्त साधी कबर दिसली पाहिजे. त्याच्याजवळ एक बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला…, त्याच पद्धतीची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली आहे. संघाने औरंगजेबची कबर राहू द्या, ज्या पाहण्याची इच्छा असेल तो ती पाहिले, असे म्हटले आहे. त्याबाबत आरएसएसचे वरिष्ठ नेता भैय्याजी जोशी यांनी वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले भैय्याजी जोशी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश भैय्याजी जोशी म्हणाले की, औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा अनावश्यक आहे. औरंगजेब इथेच मरण पावला आणि त्याची कबर बांधली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाची कबर बांधून आदर्श घालून दिला होता. यावरून भारताची औदार्य आणि सर्वसमावेशकता दिसून येते. औरंगजेबची कबर राहील आणि ज्यांना ती पाहण्याची इच्छा असेल ते जाऊन पाहू शकतात.
नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी कोण?
भैयाजी जोशी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींचा ३० मार्चचा कार्यक्रम चांगला होता. त्यांची सेवेची आवड कोरोनाच्या काळात दिसून आली. त्यांनी कोरोनाच्या काळात ऊर्जा देण्याचे काम केले. माधव नेत्रालयाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.




संघाच्या उत्तराधिकारीबाबतही भैय्याजी जोशी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, संघाच्या उत्तराधिकारीची निवड परंपरेप्रमाणे होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दावा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ प्रमुख मोहन भागवत यांना आपण निवृत्त होत असल्याचा संदेश देण्यासाठी रविवारी नागपुरात गेले होते. त्यावरुन भैय्याजी जोशी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही.
भैय्याजी जोशी यांच्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. पुढील निवडणुकीत (2029) देखील आपण मोदींना पंतप्रधान म्हणून पाहू, असे ते म्हणाले.