Mohan Bhagwat : सरसंघाचालक मोहन भागवत आणि RSS मुखपत्र ऑर्गनायजरमध्ये मशिदींच्या मुद्यावरुन मतभिन्नता
Mohan Bhagwat : अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना मशिदींच्या सर्वेबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. पण आरएसएसच मुखपत्र मानल्या जाणाऱ्या 'द ऑर्गनायजर'च मत या विषयावर वेगळं आहे.
मशिदींचे सर्वे करण्याची मागणी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर RSS प्रमुख मोहन भागवत यांनी अलीकडेच असे मुद्दे उपस्थित करणं योग्य नसल्याच मत व्यक्त केलं होतं. पण आरएसएसच मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ‘द ऑर्गनायजर’च मत या विषयावर वेगळं आहे. वादग्रस्त स्थळं आणि त्यांच्या संरचनाचा इतिहास जाणून घेणं महत्त्वपूर्ण आहे, असं ‘द ऑर्गनायजर’च मत आहे. ‘द ऑर्गनायजर’ने संभल मशिद वादावर एक कव्हर स्टोरी प्रकाशित केलीय. संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या स्थानावर एक मंदिर होतं, असा या स्टोरीमध्ये दावा करण्यात आलाय. त्यात संभलच्या सांप्रदायिक इतिहासाच सुद्धा वर्णन करण्यात आलय.
“धार्मिक कटुता आणि असमंजसची स्थिती संपवण्यासाठी एक समान दृष्टीकोन आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर जाति-आधारित भेदभावाच्या मूळ कारणापर्यंत गेलेत व हे संपलं पाहिजे म्हणून काही संवैधानिक उपाय सुचवले” असं प्रफुल्ल केतकर यांनी संपादकीयमध्ये लिहिलं आहे.
‘संघ नव्हता, तेव्हा हिंदू धर्म नव्हता काय?’
19 डिसेंबरला पुण्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले की, “अयोध्येतील राम मंदिर हा हिंदुंच्या श्रद्धेचा विषय होता. पण रोज असे नवीन मुद्दे उकरुन काढणं योग्य नाही” मोहन भागवत यांच्या वक्तव्याशी स्वामी रामभद्राचार्य यांनी असहमती व्यक्त केली होती. “मोहन भागवत हिंदुंबद्दल आवाज उठवत नाहीत. फक्त आपलं राजकारण करतात” असं स्वामी रामभद्राचार्य म्हणाले. “त्यांना झेड सुरक्षा पाहिजे. आनंदात जीवन व्यतीत करायचं आहे. संघ नव्हता, तेव्हा हिंदू धर्म नव्हता काय? राम मंदिर निर्माण आंदोलनात संघाची काही भूमिका नाहीय. आम्ही साक्ष दिली. संघर्ष आम्ही केला. त्यांनी काय केलं?” असे प्रश्न स्वामी रामभद्राचार्य यांनी विचारले.
पुण्यात मोहन भागवत काय म्हणालेले?
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात सद्भावना राहिली पाहिजे असं मत व्यक्त केलं. मंदिर-मशिदीवरुन सुरु झालेल्या नव्या वादावर नाराजी व्यक्त केली होती. अलीकडे झालेल्या वादांवर आपलं मत मांडताना ते म्हणाले की, “अयोध्येत राम मंदिर निर्माणानंतर असे वादग्रस्त विषय उपस्थित करुन काहींना असं वाटतं की, ते हिंदुंचे नेते बनू शकतात”