अयोध्या: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) अयोध्येत आले आहेत. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी हे दोन्ही नेते अयोध्येत आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा कसा असेल, किती वाजेपर्यंत चालेल, पत्रकार परिषद कुठे असेल, तसेच ते कुठे उतरतील आदींचा आढावा यावेळी घेतला जात आहे. आज राऊत यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. तसेच राम मंदिर निर्माण होत असलेल्या परिसराची पाहणीही केली. 15 जून रोजी लखनऊपासून ते अयोध्येपर्यंत आदित्य ठाकरेंचं स्वागत होणार आहे. पण हे कोणतंही राजकीय शक्ती प्रदर्शन नसेल. ही श्रद्धेची भावना असेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. या दौऱ्यात आदित्य ठाकरे मीडियाशीही संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राऊत मीडियाशी संबोधित करत होते.
नवीन जागेत प्रभू श्रीरामाचं श्रद्धास्थान आहे. त्याचं दर्शन घेतलं. ज्या ठिकाणी राम मंदिर होत आहे त्या जागेला भेट दिली. प्रसन्न वाटलं. 15 तारखेला आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. त्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. आदित्य ठाकरे येतात म्हणून इथल्या लोकांमध्ये उत्साह आहे. 15 तारखेला लखनऊपासून अयोध्येपर्यंत त्यांचं स्वागत होईल. शक्तीप्रदर्शन नाही. ही श्रद्धेची भावना आहे, असं राऊत म्हणाले.
आदित्य ठाकरे लखनऊमधून येणार आहेत. ते प्रभू रामाचं दर्शन घेतील. त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स करतील. संध्याकाळी शरयू किनारी आरती करतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत असली नकलीचे पोस्टर लागले होते. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. असली येत आहेत. नकलीचं माहीत नाही. आता असली नकलीचा निर्णय राज्य आणि देशातील जनता नेहमी करते, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. बृजभूषण सिंह मोठे नेते आहेत. आमचे मित्रं आहेत. त्यांची चळवळ सुरू आहे. ती त्यांची भावना आहे. उत्तर प्रदेशच्या लोकांच्या भावनेला त्यांनी आवाज दिला आहे. उत्तर प्रदेशातली लोकांच्या भावनेचा उद्रेक त्यांनी मांडला. ठिक आहे. पण आमचा त्यांच्या चळवळीशी काहीच संबंध नाही, असंही त्यांनी सांगितलं.
त्यांना भोंग्याच्या वादाविषयीही विचारणा करण्यात आली. त्यावर लाऊडस्पीकरचा वादच नाही. तो कधीच संपलाय. तो वाद निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू होता. त्यामागे कोण होतं हे सर्वांना माहीत आहे. पण आता तो वाद राहिला नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच अयोध्येचा जसा निर्णय सर्वांनी मानला. तसाच ज्ञानवापीचा निर्णय आम्ही मान्य करू. सर्वांनी हा निर्णय मान्य केला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.