नवी दिल्ली: माजी लष्कर प्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत यांचा काल हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत अनेक रहस्यही संपली आहेत, असं सांगतानाच रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळे देशातील सर्वोच्च नेतृत्वही गोंधळलं आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. बिपीन रावत यांच्या अचानक अपघाती जाण्याने देश आणि सरकारही गोंधळलं आहे. हा अपघात घडला तेव्हा आम्ही संसदेच्या आवारात गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करत होतो. आमचे आंदोलन सुरू असतानाच ही बातमी आली. त्यावेळी तिथेही हाहा:कार माजला. बिपीन रावत यांच्याशी अनेकवेळा संवाद साधण्याचा योग आला. ते लष्करी रुबाब बाजूला ठेवून बोलत असत. संवाद साधत असत. त्यामुळे ते प्रत्येकाला आपले वाटत होते. या घटनेनंतर देशातील सर्वोच्च नेतृत्वही गोंधळले असतील, असं राऊत म्हणाले.
रावत यांच्यासोबत आम्हाला संरक्षण समितीत काम करण्याची संधी मिळाली. ते आपले सर्वोच्च सेनापती होते. सीमेवरच्या सामान्य सैनिकांपर्यंत त्यांचा संवाद होता. अनेक किचकट आणि तांत्रिक विषय त्यांनी संरक्षण समितीत सांगून आमचा गोंधळ आणि शंका दूर केल्या. सर्व पक्षीय नेते या समितीत असतात. त्या सर्वांच्या शंकाचं निरसन केलं होतं, असं ते म्हणाले.
या दुर्घटनेमागे घातपाताची शंका व्यक्त केली जात आहे. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, तसा अंदाज व्यक्त होत आहे. पण हा राजकीय विषय नाही. हा देशाचा विषय आहे. जनतेच्या मनात काही शंका असेल तर ती समोर आली पाहिजे. त्यावर संसदेत चर्चा झाली आणि बोलण्याची संधी मिळाली तर आम्ही चर्चा करू, असंही ते म्हणाले. लष्कराची रहस्य असतात. त्यावर चर्चा करू नये असे संकेत असतात. चीनचं संकट असताना आमच्या सेनापतीने जावं दुर्देवी घटना आहे, असंही ते म्हणाले.
1952 मध्येही पुंछ भागात हेलिकॉप्टर कोसळलं होतं. त्यावेळी पाच ते सहा अधिकारी दगावले होते. तेव्हापासून त्या दर्जाच्या एका पेक्षा अधिक अधिकाऱ्यांनी प्रवास करू नये अशा सूचना करण्यात आल्या होत्या. या दुर्घटनेत रावत हेच एक सर्वोच्च दर्जाचे अधिकारी होते. पण त्यांच्यासोबत इतर महत्त्वाचेही अधिकारी होते, असं त्यांनी सांगितलं.
रावत यांच्या निधनाने अनेक रहस्य कायमची संपली आहेत. रावत यांना भेटायचो तेव्हा त्यांना तुम्हीही पुस्तक लिहा असं सांगायचो. तुम्ही काय पाहिलं, काय ऐकलं, ते लिहा असं सांगायचो. कारण तुम्ही जे ऐकलं, पाहिलं, तेवढं कुणी पाहिलं असेल असं वाटत नाही. त्यामुळे तुम्ही लिहा, असं त्यांना म्हणायचो. त्यावर ते हसायचे, म्हणायचे कोई राज राज होता है, राजही रहने दो, असंही राऊत यांनी सांगितलं.
Video : Headlines | हेडलाईन्स | 10 PM | 8 December 2021 https://t.co/gdP6IRSQFa @OfficeofUT @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra #Headlines #FastNews #MahafastNews #SuperFastNews #Tv9Marathi #DistrictNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2021
संबंधित बातम्या:
CDS : जनरल रावत यांची जागा कोण घेणार? नवे सीडीएस म्हणून मराठमोळ्या अधिकाऱ्याचं नाव आघाडीवर
ज्या डिसेंबरमध्ये सर्व काही मिळालं, त्याच डिसेंबरमध्ये शेवट, जनरल रावत यांचं डिसेंबरशी नातं काय?