पणजी: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी वाईन उद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची एका बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप आहे, असा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला होता. सोमय्यांच्या या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आमची एखादी वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी आणि चालवावी. तशी काही वायनरी असेल तर मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसेच कुणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. सोमय्यांचा मुलगा काय चणे- शेंगदाणे विकतो का? भाजप नेत्यांची मुलं काय रस्त्यावर केळी विकतात का?, अमित शहांचा (amit shah) मुलगा ढोकळा विकतो का? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी सोमय्यांना केला आहे.
संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपवर आपली भूमिका मांडली. आमची एखादी वायनरी असेल तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी. त्यांनी चालवावी. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती काही व्यवसाय करत असेल तर तो काय गुन्हा आहे का? कुणीही असेल… कुणी व्यवसाय करत असेल… कुणी काम करत असेल… बँकांना लुबाडणं, चोऱ्यामाऱ्या करणं यापेक्षा कष्ट करणं, काम करणं, श्रम करणं कधीही चांगलं. भाजपचे थोतांडी लोकं काहीही म्हणत होते. मला कुणी तरी ते सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मला फोन होता, तेही हसत होते. आमच्या कुटुंबाच्या काही वायनऱ्या असतील तर सोमय्या यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे, असं राऊत म्हणाले.
अशोक गर्ग माझे मित्रं आहेत. एखाद्या कंपनीत संचालक असणं हा काय गुन्हा आहे का? किरीट सोमय्यांची पोरं काय चणे शेंगदाणे विकतात का? भाजप नेत्यांची मुलं केळी विकतात का? काय विकतात? अमित शहांचा मुलगा केळी विकतो, सफरचंद विकतो, ढोकळा विकतो काय? विकतो काय? कुणाची मुलं काय विकतात हा व्यक्तिगत प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या नेत्यांची जी मुलं आहेत ते काय वांद्र्याच्या रस्त्यावर किंवा पेडररोडच्या रस्त्यावर स्टॉल टाकणार आहेत का की डान्सबार टाकणार आहेत? भाजपने हे धंदे बंद करावेत. महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी घाणेरडं राजकारण सुरू केलं आहे. हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील राजकारणाला संस्कार आणि परंपरा आहे. तुम्ही आमच्या मुलाबाळापर्यंत जातात. तुमची मुलं काय करतात ते पाहा. आमची मुलं ड्रग्स विकत नाही. किंवा ड्रग्सच्या आहारी गेले नाहीत तुमच्याप्रमाणे, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राऊत यांनी वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं पुन्हा समर्थन केलं. हा शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न आहे. सरकारचं धोरण एखाद्या व्यक्तीसाठी असते का? भाजपच्या किती नेत्यांचे साखर कारखाने आणि वायनरी आहेत ते पाहा, असा टोलाही त्यांनी लगावला.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 January 2022 -TV9https://t.co/NcDcdP6pF6#News | #NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 30, 2022
संबंधित बातम्या:
शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही, युतीच्या गप्पांना पूर्णविराम मिळाला; संजय राऊतांनी रोखठोक ठणकावले
संजय राऊतांची वाईन व्यवसायात गुंतवणूक, बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप