सर्वात मोठी बातमी | संजय राऊत यांची मुख्य नेते पदावरून हकालपट्टी, गजानन कीर्तिकर यांची वर्णी; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या हाती गेल्यानंतर ज्याची भीती होती, तेच घडू लागलंय. संजय राऊत यांची राज्यसभेतील शिवसेना मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission) शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर शिवसेना नेत्यांची महत्त्वाची पदं संपुष्टात येणार अशी भीती व्यक्त केली जात होती. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याऐवजी शिंदे समर्थक खासदार गजानन कीर्तिकर आता राज्यसभेचे नवे मुख्य नेते असतील. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे समर्थित शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आता संजय राऊतांविरोधातील ही कारवाई म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
राहुल शेवाळेंचं पत्र
शिवसेना संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी यासंदर्भातील एक पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलं होतं. १७ फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळेल, असा निर्णय दिला. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत गजानन कीर्तिकर यांच्या नियुक्तीचा निर्णय झाला. संसदेतील शिवसेना मुख्य नेते पदी गजानन कीर्तिकर असावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी एका पत्राद्वारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवली होती. त्यामुळे संजय राऊत यांचे राज्यसभेतील मुख्य नेते पद जाणार अशी भीती निर्माण झाली होती.
गजानन कीर्तिकरांचा सत्कार
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संजय राऊत यांची राज्यसभेतील मुख्य नेते पदावरून हकालपट्टी झाली. तर त्या पदावर गजानन कीर्तिकर यांची वर्णी लागली आहे. शिवसेना खासदारांनी संसदेतल्या शिवसेना कार्यालयात गजानन कीर्तिकर यांचा सत्कार केला. यावेळी खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, बुलढाण्याचे प्रतापराव जाधव, कोल्हापूरचे संजय मंडलिक, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे उपस्थित होते.
आयोगावर नाराजी, एकमेव आशा सुप्रीम कोर्ट
शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालालाच उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. निवडणूक आयोग भाजपने विकत घेतलाय, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. शिवसेना ही फक्त कागदोपत्र एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. खरी ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे करत आहेत. शिवसेना फुटीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार यासंदर्भातील सर्व वादावर सुप्रीम कोर्टात अत्यंत प्रभावी युक्तिवाद झाले आहेत. आता सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टाचा निकाल हाच शिवसेनेसाठी एकमेव आशेचा किरण समजला जातोय.