Seema Haider : पाकिस्तानात पाठवलं तर..सीमा हैदरची थेट धमकी, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
नेपाळच्या मार्गे भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या तिच्याकडे भारतीय नागरिकत्त्व नाही. त्यामुळेच सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानमध्ये जावे लागणार का? असे विचारले जात आहे.

Seema Haider : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त केला जातोय. या हल्ल्यानंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. याच कारणामुळे नेपाळच्या मार्गे भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या तिच्याकडे भारतीय नागरिकत्त्व नाही. त्यामुळेच सीमा हैदरला पुन्हा पाकिस्तानमध्ये जावे लागणार का? असे विचारले जात आहे. त्यानंतर आता खुद्द सीमा हैदरने पाकिस्तानला जाण्याबाबत मोठी आणि महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत
पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरला पाकिस्तानला परत पाठवले जाणार का? असे विचारले जात आहे. याच कारणामुळे सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मला पाकिस्तानला पाठवू नका, अशी विनंती ती सातत्याने करत आहे. आता मात्र तिने थेट आत्महत्या करण्याचाच इशारा दिलाय.
मी मरून जाईल, पण…
विशेष म्हणजे तिने सर्वांकडे माझी मदत करा, अशी याचना केली आहे. “मी सर्वांना विनंती करते की माझी मदत करावी. मला पाकिस्तानमध्ये जायचे नाही. मी मरून जाईल. गाडीतून खाली उडी खाऊन आत्महत्या करेन, पण मी पुन्हा पाकिस्तानमध्ये जाणार नाही,” असं सीमा हैदरनं म्हटलं आहे.
मला भारत खूप आवडतो, इथली प्रत्येक गोष्ट…
यासह “मला भारत खूप छान वाटतो. इथले लोक खूप छान आहेत. भारताची प्रत्येक गोष्ट खूपच छान आहे. इथलं जेवणही मला आवडतं,” अशी स्तुतीसुमनेही तिने भारताबद्दल उधळली आहेत.
भारतात नेमकी कशी आली होती?
सीमा हैदर 2023 साली भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांत चर्चेचा विषय ठरली होती. आपला भारतीय प्रियकर सचिन मीना याच्याशी लग्न करण्यासाठी सीम हैदर पाकिस्तानातून चक्क पळून आली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये तिचं लग्न झालेलं होतं. पहिल्या पतीपासून तिला एकूण चार मुलंदेखील होती. या मुलांसह सीमा हैदर नेपाळच्या मार्गे अवैध पद्धतीने भारतात आली होती. भारतात आल्यानंतर संपूर्ण देशभरात ती चर्चेत आली. सर्व सुरक्षाविषयक संस्थांनी तिची चौकशी केली होती. ती काही काळ तुरुंगातही होती.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर आता सीम हैदरने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे. मला पाकिस्तानमध्ये पाठवू नका, असं तिनं म्हटलं आहे. त्यामुळे आता तिचं नेमकं काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
