मोदी सरकारचा सीरम कंपनीशी करार; कोरोनाची लस अवघ्या 250 रुपयांत मिळणार
मोदी सरकार सीरम कंपनीशी करार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. | Corona vaccine
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (Serum) भेट दिल्यानंतर एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोविशील्ड ही लस मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने ‘सीरम’शी करार केला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना कोविशील्ड अवघ्या 250 रुपयांत उपलब्ध होणार आहे. (Serum Corona vaccine will be available at RS.250)
कोविशील्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळवण्यासाठी सीरम कंपनीने नुकतीच केंद्र सरकारकडे विनंती केली होती. त्यानुसार आता लवकरच सीरमला लशीच्या वापरासाठी परवानगी मिळू शकते. मात्र, त्यापूर्वी मोदी सरकार सीरम कंपनीशी करार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार आणि सीरम इन्स्टिट्युटमधील हा करार अंतिम टप्प्यात आहे. यावर आता लवकरच चर्चा होऊ शकते. सीरम केंद्र सरकारसाठी किती लशींची निर्मिती करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात सीरम केंद्र सरकारला 6 कोटी डोस उपलब्ध करून देईल, असा अंदाज आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे प्रमाण 10 कोटीपर्यंत वाढवण्यात येईल, असे समजते.
‘सीरम’चे सीईओ आदर पुनावाला यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे 2020 वर्ष संपण्यापूर्वी कोविशील्डच्या आतापकालीन वापरासाठी परवाना मागितला आहे. यामुळे असंख्य जीव वाचणार आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या अमूल्य सहकार्यासाठी आभारी आहे, असे पुनावाला यांनी म्हटले होते.
‘सीरम’च्या लशीची किंमत बाजारपेठेत जास्त
‘सीरम’कडून आतापर्यंत S11 लशीचे 4 कोटी डोस तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र, या लशीला असणारी मागणी पाहता कोविशील्डच्या 20 कोटी डोसची निर्मिती करण्याची गरज आहे.
केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि वृद्ध व्यक्तींना कोरोनाची लस देण्याचे ठरवले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कोविशिल्डचे दोन डोस देणे गरजेचे आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या यादीतील 3 कोटी लोकांसाठी 6 कोटी डोसची गरज आहे. ही लस साधारण मार्च ते एप्रिल महिन्यात बाजारपेठेत उपलब्ध होईल. खुल्या बाजारपेठेत या लशीची किंमत 500 ते 600 रुपये इतकी असेल.
संबंधित बातम्या:
COVID Vaccine | कोव्हिड लस सर्वात आधी कोणाला मिळणार? डॉ. हर्ष वर्धन यांचं उत्तर
शरद पवारांना कोरोनाची लस टोचली?; डॉक्टरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती
(Serum Corona vaccine will be available at RS.250)