दिल्लीत येण्या-जाण्यासाठी अजित पवार यांची सोय…संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले?
Sanjay Raut on Ajit Pawar: राज्यात २० तारखेला निवडणुका झाल्या. त्याला आता एक महिना झाला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बनत नाही. राज्यात रोज खून होत आहे, हत्या होत आहे. दंगली होत आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलत आहे. ते आम्हाला अक्कल शिकवत आहे, असे राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Ajit Pawar: शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतून महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात मंत्रिमंडळ अजूनही तयार होत नाही, त्याबद्दल जोरदार टीका केली. शरद पवार यांच्याविषयी आदराच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, देशाच्या सामाजिक क्षेत्रात शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. आम्हाला त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळाले आहे. आज पवार साहेब दिल्लीत होते. त्या ठिकाणी आम्ही शिवसेना आणि काँग्रेसचे खासदार गेलो होते. पवार साहेबांना शुभेच्छा दिल्या.
सुनील तटकरे यांच्यावर टीका
शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सुनील तटकरे आले होते, त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे निर्ढावलेले लोक आहेत. आम्ही असे काही केले असते तर आमची डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमत झाली नसती. आम्ही स्वार्थासाठी चूक केली असेल तर आमची बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासमोर नजर भिडवण्याची माझी हिंमत झाली नसती. त्यांच्याविरोधात प्रचार केला. चिखलफेक केली, आज ते शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या दिल्लीत निवासस्थानावर म्हणाले…
दिल्लीत खासदार शरद पवार यांना सहा जनपथ हे टाईप १ घर दिले. तर पहिल्यांदा खासदार झालेल्या सुनेत्रा पवार यांना ११ जनपथ टाईप ७ घर दिले आहे. या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही जेव्हा प्रथम आलो तेव्हा आम्हाला साधे घर दिले. कारण आम्ही प्रथम खासदार होतो. सुनेत्रा पवार यांना हे घर देऊन त्यांनी अजित पवार यांची सोय केली आहे. दिल्लीत अजित पवार यांना येणे-जाणे सोईचे व्हावे, यासाठी केलेला हा प्रकार आहे. भाजप सरकार कटकारस्थान करत असते. काही लोकांना कमी लेखत असते. दिल्ली ही कारस्थानाची राजधानी आहे.
देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलत…
दिल्लीत अजित पवार आले पण एकनाथ शिंदे आले नाही, याप्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, या विषयी मला माहीत नाही. राज्यात २० तारखेला निवडणुका झाल्या. त्याला आता एक महिना झाला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बनत नाही. राज्यात रोज खून होत आहे, हत्या होत आहे. दंगली होत आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलत आहे. ते आम्हाला अक्कल शिकवत आहे, असे राऊत म्हणाले.