नवी दिल्ली: देशात विरोधकांची एकजूट झाली पाहिजे. सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रं आलं पाहिजे. ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी या सर्वांना केवळ शरद पवारच एकत्र आणू शकतात, असं सांगतानाच सध्या नेतृत्वाचा प्रश्नच नाही. केवळ भाजपला पर्याय देणं हाच एकमेव पर्याय आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. या देशात विरोधकांची एकजूट झाली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन मतभेद दूर केले पाहिजेत. ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केवळ शरद पवार करू शकतात. नेतृत्वाचा प्रश्नच नाही. केवळ पर्यायाची चर्चा झाली पाहिजे असं पवार सुद्धा म्हणाले आहेत, असं राऊत म्हणाले.
2014मध्ये मोदी पंतप्रधान होतील असं कुणाला वाटलं नव्हतं. राजकारण हे फार चंचल आहे. देशातील जनता शहाणी आहे. आमचा आवाज दाबण्यासाठी ते काही करू शकतात. पण आमचं काम सुरू राहील. विरोधकांची एकजूट करणं हा काही देशद्रोह नाही. ही लोकशाहीची पद्धत आहे. आम्ही काही मोदोींच्या विरोधात षडयंत्र रचत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गोव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, चर्चा सुरू आहे. एवढ्या घाईत काही सांगू शकत नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच कोणताही राजकीय पक्ष निर्णय घेत असतो. आम्हीही गोव्यात 22 जागा लढणार आहोत. युती झाली तर चांगलंच होईल, असं त्यांनी सांगितलं.
भाजप महिला मोर्चच्या राष्ट्रीय सचिव दिप्ती रावत यांनी संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीच्या एका पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार नाही तर गुन्हाच दाखल केला. मी एक शब्द मागे वापरला होता. तो भावना दुखावणारा आहे असं ते म्हणतात. एखाद्याला मूर्ख म्हणणं अडाणी म्हणणं चूक आहे का? मी जो शब्द वापरला त्याचा अर्थ डिक्शनरीत मूर्ख, अति मूर्ख असा होतो. अशा शब्दावर गुन्हा दाखल केला तर कायद्याचं राज्य आहे का? त्याचा अर्थ मूर्ख आहे. या देशात सर्व डिक्शनरीत त्याचा अर्थ दिला आहे. त्या डिक्शनरी मान्यताप्राप्त आहे. सरकारी साहित्य आणि सरकारनेही मान्यता दिली आहे. अनेक पंडितांनी त्यावर मत व्यक्त केलं आहे. तरीही दिल्लीत मला विचारल्याशिवाय एक एफआयआर दाखल केला आहे. सूडाच्या भावनेतून एफआयआर दाखल केला आहे. माझा आवाज दाबण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे, असं ते म्हणाले.
आतापर्यंत सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचले नाही. कारण मी साधा माणूस आहे. त्यामुळे मला त्रास देण्यासाठी माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी असे बहाणे केले जात आहेत. हे हातखंडे वापरले जात आहेत. महाराष्ट्राबाहेर गुन्हे दाखल करत आहेत. ज्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी सांगू इच्छितो ही शिवसेना आहे. पार्लमेंट सुरू असताना गुन्हा दाखल केला आहे. कितीही गुन्हे दाखल केले तरी सत्य बोलत राहू, असं त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप https://t.co/JEK8IoGmTv #SanjayRaut | #Delhi | #BJP | @rautsanjay61 | @BJP4India
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2021
संबंधित बातम्या: