‘या’ यात्रेला हलक्यात घेऊ नका, कधी काळी सोनियांच्या यात्रेनं भाजपचा डाव उलथला होता… वाचा सविस्तर
भारतीय राजकारणातील धीरगंभीर अशी प्रतिमा असणाऱ्या सोनिया गांधींना राजकारणाच्या पटलावरील एक हुशार व्यक्तिमत्व मानलं जातं.
नवी दिल्लीः सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेमुळे (Bharat Jodo Yatra) चर्चेत आले आहेत. काँग्रेसला नवी उभारी देण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून पक्षाच्या भवितव्यासाठी नवी योजना आखली आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेलाही दक्षिण भारतात चांगला पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही (Sonia Gandhi) या यात्रेत सामील होऊन त्यांनीही चिरंजीव राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत पदयात्रेला सुरुवात केली आहे. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यातून सुरू झालेल्या या प्रवासातील आई आणि मुलाचे अनेक फोटो आता व्हायरल झाले आहेत. आपल्या चिरंजीवांसाठी त्या आता रस्त्यावर उतरुन भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 2004 मध्ये भाजपचा विजय पक्का मानला जात होता. त्यावेळी सोनिया गांधींनीही अशीच जनसंपर्क मोहीम सुरू केली होती.
त्यामुळे सोनिया गांधींच्या या भेटीचा परिणाम असा झाला की, सार्वत्रिक निवडणुकीत हा खेळ भाजपवरच उलटला. सोनिया गांधींच्या राजकीय प्रवासातील त्यांचा हा इतिहास…
भारतीय राजकारणातील धीरगंभीर अशी प्रतिमा असणाऱ्या सोनिया गांधींना राजकारणाच्या पटलावरील एक हुशार व्यक्तिमत्व मानलं जातं.
भाजपप्रणित एनडीएचा काळ होता आणि तो काळ म्हणजेच 2004 मध्ये भाजपचा सुवर्णकाळ चालू होता. त्याकाळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा विजय निश्चितच मानला जात होता.
त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या भाजपचा पराभव करणे कठीण झाले होते.
आणि त्याच काळात सोनिया गांधींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सोनिया गांधींनी आपल्या जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली, आणि बदलला सुरुवात केली.
वाजपेयी यांच्या काळात उत्तर प्रदेशात सोनिया गांधींनी गावोगावी जाऊन जनसंपर्क कार्यक्रम राबवला. रस्त्यावर आणि लोकांतून जाऊन त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्याकाळी सोनिया गांधींनी प्रचारात अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी त्यांनी नेमक्या त्याच ठिकाणी ताफा थांबायचं हे सूत्र अवलंबविले नव्हते. तर त्यांचा ताफा कुठेही थांबायचा.
आजही ज्या प्रकारे सोनिया गांधींनी आपला प्रवास चालू ठेवला आहे, त्याच प्रकारे राहुल गांधींनीही आपल्या भारत जोडो यात्रेत अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, जनसामान्यांच्या मुलांना मिठी मारतानाचे, मुलांना उचलून घेतानाचे अनेक फोटो त्यांचे व्हायरल झाले आहेत. त्याच प्रकारचे फोटो सोनिया गांधींचेही त्याकाळी प्रसिद्ध झाले होते.
जनसंपर्क अभियानादरम्यान सोनिया गांधींचा ताफा कुठेही थांबत होता. यादरम्यान सोनिया गांधीही महिलांना जाऊन भेटत, मुलांना मायेनं जवळ घेतानाचे फोटो वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते.
त्याकाळी सोशल मीडियाचा जमाना नव्हता, मात्र त्याकाळीही सोनिया गांधींच्या फोटोची प्रचंड चर्चा झाली होती. आणि याच प्रचाराचा परिणाम सार्वत्रिक निवडणुकीत दिसून आला. काँग्रेसने निवडणुकीत आश्चर्यकारक कामगिरी केली आणि सरकार स्थापन करण्यात यशही मिळवले.