Special Story | अमृता आणि इमरोज : अव्यक्त प्रेमाची बोल्ड अँड ब्यूटिफूल कहाणी
लिव्ह इन रिलेशनशीप या शब्दाची आधारशिला भारतात कोणी रोवली, तर त्या म्हणजे दिवंगत लेखिका अमृता प्रीतम यांनी. चित्रकार इमरोजसह त्यांच्या अव्यक्त प्रेमाची ही दिलखुलास कहाणी.. त्यांच्याच शब्दात (Special Story on Amrita Pritam Imroz Love Story)
विवाह न करता आयुष्यभर एकत्र राहण्याची संकल्पना अजूनही भारतात फारशी रुजलेली नाही. एकविसाव्या शतकातही लिव्ह इन रिलेशनशीपसारखा विषय टॅबू मानला जातो. मात्र आजपासून ठीक सहा दशकांपूर्वी एका भारतीय तरुणीने हा बोल्ड निर्णय घेतला होता. तेही एका घटस्फोटानंतर… आणि स्वतःपेक्षा तरुण पुरुषासोबत लग्नाविना राहण्याचा.. ती तरुणी म्हणजे महान लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम… आणि तो युवक म्हणजे प्रख्यात कलाकार इमरोज… (Special Story on Amrita Pritam Imroz Love Story)
आखिरी खत… पहली मुलाकात
अमृता आणि इमरोज यांच्या प्रेमाचा सिलसिला हळूहळू सुरु झाला. सेठी नावाच्या चित्रकाराला ‘आख़िरी ख़त’ या आपल्या पुस्तकाच्या कव्हरचं डिझाईन करण्याची विनंती अमृता यांनी केली होती. मात्र सेठींनी आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने हे काम करु शकणाऱ्या एका व्यक्तीचं नाव त्यांना सुचवलं. सेठींच्या निमित्ताने अमृता प्रीतम यांच्या आयुष्यात इमरोजची एन्ट्री झाली. त्यावेळी इमरोज हा ‘शमा’ नावाच्या उर्दू वर्तमानपत्रात काम करत असे. अमृता यांच्या सांगण्यानुसार इमरोजने त्यांना कव्हरपेज डिझाईन करुन दिलं.
इमरोज हा किस्सा रंगवून सांगत असत, “अमृता यांना कलाकृती तर आवडलीच, पण कलाकारही त्यांच्या पसंतीस उतरला. आमच्या भेटीगाठी वाढू लागल्या. आमची घरं जवळपासच होती. मी दिल्लीच्या दक्षिण पटेल नगरात राहत होतो, तर त्या पश्चिम पटेल नगरमध्ये”
अमृता यांचा विवाह प्रीतम सिंहसोबत झाला होता. मात्र काही वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. नवरा दूर गेला, पण नाव चिकटलं ते कायमचं.
डोळ्यात वाच माझ्या…
“एकदा मी सहज त्यांना भेटायला गेलो होतो. बोलता-बोलता मी म्हणालो की आजच्या दिवशीच माझा जन्म झाला होता. गावात लोक जन्माला तर येतात, मात्र त्यांचे जन्मदिवस नसतात. त्या एक मिनिटं उठल्या, बाहेर गेल्या आणि पुन्हा येऊन बसल्या. काही वेळाने एक नोकर प्लेटमध्ये केक ठेवून बाहेर गेला. केकचा एक तुकडा त्यांनी माझ्यासाठी कापला, आणि एक स्वतः खाल्ला. त्यांनी हॅपी बर्थडे वगैरे शुभेच्छाही दिल्या नाहीत. मीही त्यांचे आभार मानले नाहीत. आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो. डोळ्यात पाहून एकमेकांना जाणीव होत होती, की आम्ही आनंदी आहोत.” इमरोज सांगताना अधिक उत्साही असत.
पहिल्या नज्मचा विषय होता राजन
इमरोजशी ओळख होण्याच्या आधीपासूनच कवयित्री अमृता प्रीतम यांच्या मनात एक काल्पनिक प्रियकर होता. गंमत म्हणजे, त्यांनी त्याचं नामकरणही केलं होतं…. राजन… त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या नज्मचा विषयही तोच होता…
अमृता शाळेत असतानाची गोष्ट. त्यांनी नज्म लिहून आपल्या खिशात ठेवली होती. मात्र दुर्दैवाने तो कागद त्यांच्या वडिलांच्या हाती पडला. नज्म वाचून त्यांनी रागाने विचारलं… कोण आहे हा राजन? अमृता यांनी खोटंच आपल्या मैत्रिणीचं नाव पुढे केलं. पण त्यांचे वडीलही अमृतांची प्रतिभा जाणून होते. झालं.. त्यांचं भांडं उघडं पडलं. वडिलांनी अमृता प्रीतम यांच्या कानाखाली आवाज काढला आणि तो नज्म लिहिलेला कागदही टराटरा फाडला.
आपलं प्रेम व्यक्त करण्याची, थोडक्यात प्रेमाचा इज़हार करण्याची इच्छा प्रत्येक प्रेयसी-प्रियकराची असते. मात्र अमृता आणि इमरोज या बाबतीत दुर्दैवीच म्हणायचे. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, हे त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही.
प्रित लपवुनि लपेल का?
“प्रेम आहे, तर बोलून काय दाखवायचं? चित्रपटातही तुम्ही हिरो-हिरोईनमधील जवळीक, त्यांची देहबोली दाखवून त्यांचं एकमेकांवरील प्रेम अधोरेखित करु शकता, मात्र त्यांच्या तोंडी वारंवार आय लव्ह यू सारखे डायलॉग्ज दिले जातात. मला हसू येतं जेव्हा ते म्हणतात माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे… अरे बाबांनो प्रेम कधी खोटं असतं का?” असा प्रश्न विचारुन इमरोज खुदकन हसतो.
“स्त्री आणि पुरुष एकाच खोलीत राहण्याची परंपरा आहे. आम्ही दोघं एका छताखाली राहायचो… पण आमच्या खोल्या वेगवेगळ्या होत्या. त्या रात्रीच्या वेळी लिखाण करायच्या. कारण या वेळा ना कुठला आवाज असतो, ना कोणाचा टेलिफोन, ना कोणाची ये-जा” असं इमरोज सांगतो.
“त्यावेळी मीही झोपलेलो असायचो. पण त्यांना लिहिताना चहाची तल्लफ यायची. आता त्या उठून चहा बनवायला कशा येणार, म्हणून मी रात्री एक वाजता उठायला सुरुवात केली. मी चहा करुन गपचूप त्यांच्यासमोर ठेवायचो. त्या लिखाणात इतक्या गुंतलेल्या असायच्या की माझ्याकडे मान वर करुनही पाहायच्या नाहीत. हा प्रकार चाळीस-एक वर्ष नित्य नियमाने चालत आला.” (Special Story on Amrita Pritam Imroz Love Story)
अव्यक्त प्रेम कहाणी
उमा त्रिलोक या अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्या निकटवर्तीय होत्या. त्यांनी दोघांच्या आयुष्यावर एक पुस्तकही लिहिलं होतं… ‘अमृता अँड इमरोज़- अ लव्ह स्टोरी.’
त्यांनी लिहिलं, “अमृता-इमरोज रिलेशनशीपमध्ये तर होते, मात्र त्यात स्वातंत्र्यही खूप होतं. खूप कमी जणांना माहित आहे, की ते एका घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत. याविषयी छेडल्यावर इमरोज म्हणत, आम्हाला एकमेकांचा गंध तर येतो ना.. एकमेकांवर अवलंबून असलेल्या पण कुठलाही हक्क न गाजवणाऱ्या जोड्या विरळाच.”
का रे दुरावा
1958 मध्ये इमरोजला मुंबईत नोकरी मिळाली, तेव्हा अमृता मनातून खिन्न झाल्या. साहिर लुधियानवीप्रमाणे इमरोजही आपल्यापासून दूर जाईल, अशी भीती त्यांना सतावत होती. इमरोज सांगत, की गुरुदत्तना मला आपल्यासोबत ठेवायचं होतं. मात्र पगाराविषयी काही ठरत नव्हतं. एके दिवशी थेट अपॉइंटमेंट लेटरच माझ्या हाती आलं. माझ्या मनाजोगते पैसे देण्यासाठी ते तयार झाले. मी खूप खुश झालो. दिल्लीत मी माझा आनंद शेअर करण्यासारखी अमृता ही एकमेव व्यक्ती होती. माझा आनंद पाहून तीही आनंदली, पण क्षणात तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं.
अमृताने आढेवेढे घेत सांगितलं, की ती मला मिस करेल, पण एक लेखिका मनातलं शब्दातून व्यक्त करु शकली नाही. मला जाण्यासाठी तीन दिवस बाकी असताना ती म्हणाली, हे जणू माझ्या आयुष्यातले शेवटचे तीन दिवस आहेत. ते तीन दिवस मी तिच्यासोबत सतत राहिलो. ती म्हणेल तिकडे गेलो. मग मला मुंबईला जाणं भाग होतं. मी मुंबईला जातो, तोच तिला ताप आला. मी क्षणाचाही विलंब न लावता ठरवलं, की नोकरीला लाथ मारायची. दुसऱ्याच दिवशी मी फोनवरुन कळवलं, अमृता मी येतोय…
अमृताने विचारलं, सगळं ठीक आहे ना? मी बोललो, सगळं ठीक आहे पण मी या शहरात नाही राहू शकत. मी तुझ्यासाठी येतोय, हे काही मी बोलू शकलो नाही. मी तिला माझ्या ट्रेन आणि कोचचा नंबर दिला होता. मी दिल्लीला पोहोचलो तेव्हा ती माझ्या कोचसमोर उभी होती, आणि तिचा ताप कुठच्या कुठे पळून गेला होता.
श्वासात एकरुप झालेले अमृता-इमरोज
अमृता प्रीतम यांचा अखेरचा काळ फार अडचणीत गेला. बाथरुममध्ये पडल्याने त्यांच्या कंबरेचं हाड मोडलं होतं. दुखण्याने त्यांची पाठ अखेरपर्यंत सोडली नाही. या काळात इमरोजने स्वतःला त्यांच्या सेवेत पूर्णपणे झोकून दिलं. त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्यावर कविता रचणं, त्यांच्या आवडीची फुलं आणणं, अशा शक्य त्या सर्व प्रकारे इमरोज त्यांचं मन रमवत. पण देवाने आज्ञा दिली आणि अमृता-इमरोजच्या अव्यक्त नात्याची अखेर झाली. 31 ऑक्टोबर 2005 रोजी अमृता प्रीतम यांनी अखेरचा श्वास घेतला. भूतलावरील त्यांच्या सहजीवनाला पूर्णविराम लागला, मात्र इमरोजच्या श्वासांसोबत अमृता यांचं जगणं सुरुच होतं…
(Special Story on Amrita Pritam Imroz Love Story)