Subrata Roy : सहारा ग्रुपचे अध्यक्ष सुब्रत रॉय यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Subrata Roy Death प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झाले. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजारी असून त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उद्या त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल.
मुंबई : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय (Subrata Roy) यांचे मंगळवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 75 वर्षांचे होते. सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांचे पार्थिव लखनौमधील सहारा शहरात आणले जाईल, जिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते.
समाजवादी पक्षाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून श्री सुब्रत रॉय यांच्या निधनाने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. अतिशय दु: खी. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. भावपूर्ण श्रद्धांजली.
जामिनावर बाहेर होते सुब्रत रॉय
अनेक वर्षांपासून लोकांचे पैसे न दिल्याने सहारा इंडियाविरुद्ध पाटणा उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. लोकांनी हे पैसे कंपनीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवले होते. मात्र नंतर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सहाराश्रींना मोठा दिलासा मिळाला. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने पाटणा उच्च न्यायालयाच्या अटकेच्या आदेशावर तात्काळ सुनावणी करून स्थगिती दिली होती. तसेच, त्याच्यावर पुढील कारवाईबाबत स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
सुब्रत रॉय यांच्यावरही असाच एक खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ते जामिनावर बाहेर होते. तर दुसरीकडे, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबत सहारा इंडियाचा दावा आहे की त्यांनी संपूर्ण रक्कम सेबीकडे जमा केली आहे.