जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 2 युवकांची हत्या, सैन्याकडून परिसराची कडक नाकेबंदी
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी 2 स्थानिक युवकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यात दोघांचाही मृत्यू झालाय.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहराजवळील बलीपोरा गावात संशयित दहशतवाद्यांनी शनिवारी (29 मे) सायंकाळी 2 स्थानिक युवकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यातील एकाच रुग्णालयात जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला. दुसऱ्या युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झालेत. पोलिसांनी शोध मोहिम राबवत या परिसराची कडक नाकेबंदी केलीय (Suspected terrorist Killed 2 civilians in Anantnag Jammu and Kashmir).
काश्मीर झोनचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अज्ञात बंदुधाऱ्यांनी दोन युवकांवर गोळीबार केला. यात ते दोघेही जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र यातील अब्दुल अझीम पारे यांचा मुलगा संजीद अहमद पारे (19) याला मृत घोषित करण्यात आलं. दुसरा घुकलाम कादिर भट यांचा मुलगा शान भटला उपचारासाठी श्रीनगरमधील SKIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान हल्लेखोरांना पकडण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात नाकेबंदी करण्यात आलीय. पोलिसांनी या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे.”
शोपियांमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार
दरम्यान, अन्य एका घटनेत जम्मू काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षादलात चकमक झाली. यात एक दहशतवादी मारला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे शोपियां जिल्ह्यातील गनोवपोरा गावात एक दहशतवादी असल्याचं समजलं. त्यामुळे सुरक्षादलाने या भागात शोधमोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्याने जवानांवर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत संबंधित दहशतवादी मारला गेला. घटनास्थळावरुन एक एके रायफल आणि काही आक्षेपार्ह साहित्य मिळालं आहे.”
कुपवाडा जिल्ह्यात स्फोट होऊन एका तरुणीचा मृत्यू
कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या स्फोटात एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. या स्फोटात तरुणीची आई देखील जखमी झालीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंडवाराच्या शरकूत विलगाम परिसरात राहणाऱ्या सारा बेगम (49) आणि त्यांची मुलगी गुलनाज बानो बुधवारी (26 मे) भाजी आणण्यासाठी जंगलात गेल्या. भाजी आणतानाच त्यांना जंगलात हा बॉम्ब सापडला असावा. मात्र त्यांना तो बॉम्ब असल्याचं लक्षात आलं नसावं. त्यांनी घरी आल्यावर भाजीची पिशवी रिकामी करण्यासाठी जशी जमिनीवर सोडली तसा बॉम्ब जमिनीवर आदळून स्फोट झाला. यात मायलेकी दोघी जखमी झाल्या. तरुणी गलनाज इतकी जखमी होती की तिचा जागेवरच मृत्यू झाला, तर आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हेही वाचा :
दहशतवादी संघटनेशी संबंध, जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी
धूमसते काश्मीर, 72 तासात 12 दहशतवाद्यांना कंठस्नान, वाचा 4 ऑपरेशन्सची माहिती सविस्तर
जम्मू-काश्मीर: शोपियांमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत चार दहशतवादी ठार
व्हिडीओ पाहा :
Suspected terrorist Killed 2 civilians in Anantnag Jammu and Kashmir