‘बिहारच्या जनतेसाठी जीवाचं रान करीन’, लालूंच्या सुपुत्राचा निवडणूक अर्ज दाखल
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राघोपुर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी यादव निवडणूक लढवत आहेत
पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Tejashwi yadav Nomination Filling Raghopur Bihar Vidhansabha)
बिहारच्या जनतेच्या हितासाठी मी सदैव कार्यरत राहील. जनतेसाठी जीवाचं रान करीन. राज्याच्या प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळवून देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मात्र या सगळ्यात बिहारच्या जनतेची साथ मला हवी आहे. ती मला जरूर मिळेल, असा विश्वास तेजस्वी यांनी व्यक्त केला.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांचे तेजस्वी पुत्र आहेत. माजी उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते आहेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यांच्यानंतर तेजस्वी आपली छाप पाडण्यात यशस्वी होताना दिसत आहेत.
बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे आरजेडी आणि काँग्रेस यांची आघाडी त्यांना टक्कर देण्यासाठी मैदानात आहेत. तर एलजेपीचे नेते चिराग पासवान यांनी जेडीयूशी फारकत घेत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचलेली आहे.
लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याचा आरोप असल्याने ते निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी नसतील. त्याच्या अनुपस्थितीची तेजस्वी यांना सहानुभूती मिळणार की तोटा होणार हे बघावं लागेल. आमचं सरकार आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात आधी 10 लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय घेऊ, असं आश्वासन तेजस्वी यांनी जनतेला दिलं आहे.
बिहार निवडणूक 3 टप्प्यात, 10 नोव्हेंबरला निकाल
बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे.
(Tejashwi yadav Nomination Filling Raghopur Bihar Vidhansabha)
संबंधित बातम्या
बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस बिहार निवडणूक प्रभारी, नवी दिल्लीत भूपेंद्र यादवांची घोषणा
Bihar Assembly Elections 2020 | बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यांत निवडणूक