ऐकावे ते नवलंच! या राज्यात शेण चोरीच्या घटना इतक्या वाढल्या की, लोकांना द्यावा लागतोय पहारा
मौल्यवान वस्तूंची चोरी ही काही नवीन बाब नाही, मात्र या राज्यात शेण चोरी होत आहे. या घटनांसाठी सरकारची एक योजना कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
कोरबा, मोबाईल, रोख रक्कम, सोने-चांदी किंवा कोणत्याही महागड्या वस्तूंची चोरी तुम्ही ऐकली असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की शेणाचीही चोरी (dung theft) होऊ शकते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, शेण चोरून कुणाला काय फायदा होणार? तर या चोरलेल्या शेणाची किंमत जवळपास 1600 रुपये आहे. म्हणजे चोरी करणारी व्यक्ती हे शेण विकून 1600 रुपये कमवू शकतो. छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात चोरट्यांची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीकडेच या जिल्ह्यातील धुरेना गावातून 800 किलो शेणाची चोरी झाली होती. या विचित्र चोरीबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना 8-9 जूनची आहे, आम्हाला मध्यरात्री दिपका पोलीस स्टेशन हद्दीतील धुरेना गावातून 800 किलो शेणाची चोरी झाल्याची माहिती मिळाली होती. या संदर्भात 15 जून रोजी रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
का चोरी जात आहे शेण
वास्तविक, राज्य सरकारने कृषी खत निर्मितीसाठी गोधन न्याय योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत शेणखत 2 रुपये किलो या दराने खरेदी केले जाते. छत्तीसगड सरकारच्या महत्त्वाकांक्षी गोधन न्याय योजनेचा लाभ गावातील शेतकरी, पशुपालकांना मिळत आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा बंपर लाभ मिळाल्याचा दावा सरकार नेहमीच करत असते. मात्र शेण चोरीच्या घटनांमुळे लोकांची आर्थिक स्थिती एवढी बिकट आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
गोठ्यातून झाली शेणाची चोरी
छत्तीसगडमध्ये शेण चोरीचे पहिले प्रकरण ऑगस्ट (2020) मध्ये कोरबा जिल्ह्यातून समोर आले. येथील मनेंद्रगढ ब्लॉक परिसरात गोठ्यात ठेवलेले सुमारे 100 किलो शेण अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची माहिती गावकऱ्यांनी गोठण समितीच्या अध्यक्षांना दिली. त्यानंतर चोरट्यांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आला होता. यानंतरही शेणचोरीच्या घटना कमी झालेल्या नाही. परिणामी शेण चोरीला आळा घालण्यासाठी लोक पहारा देत आहेत.