राहुल गांधी यांच्या यात्रेचे नाव बदलले, आता असेल, ‘भारत जोडो…’
कॉंग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा देशातील नागरिकांना भेटण्यासाठी नव्या भारत जोडो यात्रेला निघाले आहेत. या यात्रेचे नाव आता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी यात्रा सध्या धगधगत असलेल्या मणिपूरच्या राज्यातून सुरु होणार आहे आणि मुंबईत तिचा समारोप होणार आहे.
मुंबई | 4 जानेवारी 2023 : कॉंग्रेसला पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीत केवळ तेलंगणाने यश दिले. परंतू इतर महत्वाच्या मोठ्या राज्यातील पराभवाने या यशाला झोकाळून टाकले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा जनतेते संचार करण्यासाठी नव्या यात्रेला निघाले आहेत. या यात्रेचे नाव आता ‘भारत जोडो, न्याय यात्रा’ असे असणार आहे. याबद्दल कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी माहीती दिली आहे. याआधी या यात्रेचे नाव ‘भारत न्याय यात्रा’ असे ठेवण्यात आले होते.
या यात्रेची सुरुवात सध्या धगधगत असलेल्या मणिपूरची राजधानी इम्फाळमधून होणार आहे. 14 जानेवारीला दुपारी 12 वाजता ही राहुल गांधीची यात्रा सुरु होणार असल्याचे कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. या यात्रेला कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हिरवा झेंडा दाखविणार आहेत. जयराम रमेश यांनी सांगितले की या यात्रेदरम्यान राहुल गांधी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यावर आपले विचार जनतेसमोर ठेवणार आहेत.
110 जिल्ह्यातून 6,700 किलोमीटरचा प्रवास
6,700 किलोमीटर लांबीची ही यात्रा 15 राज्यातून प्रवास करणार आहे. या दरम्यान राहुल गांधी डोंगर दऱ्यांचा नैसर्गिक अडथळे असल्याने बस आणि पायी अशी दोन्ही प्रकारे प्रवास करणार आहे. या यात्रेमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षाचे नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रे अंतर्गत 67 दिवसात 6713 किमीचा प्रवास करतील. ही यात्रा 15 राज्याच्या 110 जिल्ह्यातून प्रवास करेल. 100 लोकसभा मतदार संघातून ही यात्रा जाईल. मुंबईत या यात्रेचा समारोप होईल असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गुरुवारी ( 4 जानेवारी ) कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत साल 2024 च्या निवडणूकांची तयारी आणि राहुल गांधी यांच्या मणिपूर ते मुंबई दरम्यानच्या यात्रेवर चर्चा झाली. या बैठकीला कॉंग्रेसचे सर्व प्रदेश अध्यक्ष देखील हजर होते.
भारत जोडो यात्रा फळली होती
राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंतच्या 4000 किमी लांबीच्या पहिल्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे देशातील वातावरण बदलले आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली होती असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. ही यात्रा पक्षासाठी आणि देशाच्या इतिहासात मैलाचा दगड सिद्ध झाली होती असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. आता नव्या “भारत जोडो न्याय यात्रा” कॉंग्रेसला काय फायदा होतो ते येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत चित्र स्पष्ठ होईल असे म्हटले जात आहे.