Gyanvapi Masjid : ज्ञानवापी मशिदीच्या बाहेर, भगवाधारी महिलेने भर रस्त्यावर पढली नमाज; म्हणाली, स्वप्नात आले बाबा फरीद
ज्ञानवापी मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केली जाणार आहे. मोठ्या संख्येने नमाज अदा करण्यासाठी लोकांचे आगमन झाले आहे. त्यामुळे मशिदीत प्रचंड गर्दी आहे.
काशी : वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराच्या (Kashi Vishwanath Temple) गेटवर एका महिलेने अचानक मंदिराच्या 4 क्रमांकाच्या गेटसमोर नमाज अदा करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे तेथे एकच खळबळ उडाली. बराच वेळ ती महिला नमाज (Namaz) अदा करत राहिली. बराच वेळ थांबल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला जबरदस्तीने उचलले आणि त्या महिलेला ताब्यात घेतले. यावेळी तेथे कोणीही विरोध केला नाही. सध्या येथे वातावरण शांत आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या चार क्रमांकाच्या गेटबाहेर नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम महिलेचे (Muslim Women) नाव आईसा असल्याचे सांगण्यात येत आहे. ती वाराणसीच्या जैतपुरा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. विश्वनाथ मंदिराबाहेर नमाज अदा केल्याप्रकरणी त्यांना ठाणे चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरील महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर अधिक चौकशी केल्यानंतर तिच्या स्वप्नात बाबा फरीद आले होते. म्हणून नमाज अदा करायला आल्याचे त्या महिलेने सांगितले.
रस्त्याच्या मधोमध नमाज अदा करण्यास सुरुवात
वाराणसीच्या चौक पोलिसांनी सांगितले की, दुपारी अचानक एका महिलेने काशी विश्वनाथ मंदिराच्या गेट क्रमांक 4 समोरील रस्त्यावर नमाज अदा करण्यास सुरुवात केली. हे पाहून महिला उपनिरीक्षक आणि जवानांनी तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. त्यानंतर ही महिला मानसिक आजारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान ती तिचा पत्ता कधी फरीदपूर तर कधी बरेली सांगत होती. त्यानंतर तिची खरी ओळख समोर आली. जैतपुरा येथील आयशा बीबी असे त्या महिलेचे नाव आहे.
मानसिक रुग्णालयाचे प्रिस्क्रिप्शन
त्याचवेळी तिच्या बॅगेतून मानसिक रुग्णालय आणि कबीरचौरा रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांची प्रिस्क्रिप्शन पोलिसांना मिळाली आहे. त्यात काही देवतांची चित्रेही सापडली आहेत. चौकशीत महिलेने सांगितले की, बाबा फरीद तिच्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी तिला ज्ञानवापी येथे जाण्यास सांगितले. म्हणून ती येथे आली होती आणि रस्त्यातच बसली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला मानसिकदृष्ट्या गोंधळलेली दिसत आहे.
शुक्रवारची नमाज
विशेष म्हणजे आज ज्ञानवापी मशिदीत शुक्रवारची नमाज अदा केली जाणार आहे. मोठ्या संख्येने नमाज अदा करण्यासाठी लोकांचे आगमन झाले आहे. त्यामुळे मशिदीत प्रचंड गर्दी आहे. यावर काशीतील लोकांनी सांगितले की, आजपर्यंत इतकी गर्दी त्यांनी कधी पाहिली नाही, आज मंदिर आणि मशिदीच्या सर्वेक्षणामुळे इतकी गर्दी होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
मंदिर आणि मशिदीचे सर्वेक्षण
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद संकुलात असलेल्या शृंगार गौरीसह इतर देवतांचे संरक्षण आणि पूजा करण्याच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आज मंदिर आणि मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. दुपारी तीननंतर कोर्ट कमिशनरच्या नेतृत्वाखाली मंदिर आणि मशिदीचे सर्वेक्षण करून व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी हिंदू बाजूचे सुमारे 15 लोक, कोर्ट कमिशनरचे पथक, 3 छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफर देखील उपस्थित राहणार आहेत. प्रतिवादी मुस्लिम बाजूचे 5 वकील आणि अंजुमन व्यवस्था मसाजिद कमिटीचे लोक असतील. सर्वेक्षणाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून काशी विश्वनाथ मंदिराच्या कानाकोपऱ्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
सर्वेक्षणाच्या वेळ दुपारी 3.30 च्या सुमारास
काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना किंवा कोणत्याही व्यक्तीला सखोल तपासणीनंतरच प्रवेश दिला जात आहे. तर मशिदीची सुरक्षा व्यवस्था आधीच निमलष्करी दलाकडे सोपवण्यात आली आहे. तर सर्वेक्षणाच्या वेळ दुपारी 3.30 च्या सुमारास निश्चित करण्यात आली आहे.703245