Parliament Attack | संसेदतील घुसखोरीनंतर आरोपींचा अंगावर शहारे आणणारा प्लॅन; काय झाला खुलासा
Parliament Attack | देशाच्या सर्वोच्च सभागृहाची अभेद्य सुरक्षा व्यवस्था भेदून गोंधळ घातल्याची घटना उभ्या जगाने पाहिली. याप्रकरणी तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहे. त्यात एका पाठोपाठ एक धक्कादायक बाबी समोर येत आहे. या तरुणांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रकार केला की यामागे आणखी त्यांचा काही हेतू होता हे, तपासण्यात येत आहे.
नवी दिल्ली | 17 डिसेंबर 2023 : नवीन संसदेच्या लोकसभा सभागृहात आणि परिसरात तरुणांनी धुडगूस घातला होता. 13 डिसेंबर 2023 रोजी या घटनेने देश हादरला. तर अवघे जग स्तब्ध झाले. घुसखोरी करणारे तरुण देशातील विविध भागातील आहेत. त्यातील दोघांनी लोकसभा सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोक क्रॅकर्सने रंगीत धूर केला. इतरांनी संसद परिसर घोषणांनी दणाणून सोडला. या तरुणांच्या तात्काळ मुसक्या आवळण्यात आल्या. तपास यंत्रणा त्यांची कसून चौकशी करत आहेत. त्यात एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या तरुणांनी असा पण एक ‘प्लॅन’ आखला होता.
काय होता प्लॅन?
संसदेत घुसखोरी केल्यानंतर हे सर्व तरुण आत्महत्या करणार होते, असे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. संसदेत घुसखोरी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून तयारी सुरु होती. त्यासाठी या तरुणांच्या भेटी-गाठी पण झाल्या. त्यांनी संसद परिसराची सहा महिन्यांपूर्वी रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी घुसखोरी केली. स्मोक क्रॅकर्सचा रंगीत धूर केला. घोषणा दिल्या. त्यांचा कोणाला इजा पोहचविण्याचा उद्देश नव्हता, हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेनंतर सांगितले. पण त्यांचा स्वतःला संपविण्याचा प्लॅन होता, हे आता तपासात समोर आले आहे. पण नंतर काही कारणाने ही योजना रद्द झाली.
राजकीय पक्षाची पण तयारी
संसदेत घुसखोरी करुन देशभरात चर्चेत येऊ आणि त्यानंतर राजकीय पक्ष स्थापन करु, अशी पण त्यांची योजना होता. ते अशी काही मोठी कृती करु इच्छित होते, जेणे करुन मीडियाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाईल. पण त्यांच्या अनेक योजना अगोदरच बारगळल्या. त्यात केवळ स्मोक क्रॅकर्सची योजना अंमलात आणता आली. याप्रकरणात तपासादरम्यान प्रत्येक आरोपी वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलिसांच्या डोक्याला ताप झाला आहे. सखोल तपास करत असताना प्रत्येक आरोपीकडून वेगळी माहिती समोर येत आहे. संसद सुरक्षा भेदल्याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यातील तिघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. 13 डिसेंबर 2023 रोजी ही घटना घडली होती.