तिघे एकत्र ऑफिसला जायचे, एकत्र घरी यायचे, तिघांनी एकत्रच घेतला जगाचा निरोप; तिघा भावांसोबत नेमके काय घडले?
तिघे भाऊ नेहमीप्रमाणे काम आटोपून आपल्या गाडीने घरी परतत होते. मात्र घरी पोहचण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. यानंतर तिघांचे थेट मृतदेहच घरी पोहचले.
बाडमेर : राजस्थानमधील बाडमेरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ऑफिसवरुन घरी येत असताना तिघा भावांवर काळाने घाला घातला. रस्ते अपघातात तीन भावांचा दुःखद मृत्यू झाला आहे. तिघेही कामावरून गावी परतत होते. ते ज्या स्कॉर्पिओमधून येत होते ती पलटली आणि त्याच त्यांचा मृत्यू झाला. तिघेही एकमेकांचे चुलत भाऊ, मामे भाऊ आहेत. मृतांमधील एका भावाचा 22 मे रोजी विवाह होणार होता. त्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. तरुण मुलांच्या मृत्यूमुळे तिन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
बारमेर जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील महाबर रोडवर मंगळवारी रात्री ही घटना घडली. खंगारसिंग वंशीय कानसिंग, श्यामसिंग वारसाल सिंग आणि प्रेमसिंग वंशीय उम्मेद सिंग अशी तिघा भावांची नावे आहेत. हे तिघे स्कॉर्पिओमधून महाबर रोडवरील कार्यालयातून मिठडा गावात परतत होते.
गाडीचा टायर फुटल्याने अपघात
अन्नदानीच्या ढाण्याजवळ भरधाव स्कॉर्पिओचा टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन पलटी झाली. वाहन पलटी झाल्याने त्यात बसलेले तिघे भाऊ गंभीर जखमी झाले. यात खंगारसिंग आणि श्याम सिंग यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रेमसिंगचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. घटनास्थळाजवळून चालेल्या लोकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
दोघांचा जागीच मृत्यू, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर एका जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे तिन्ही कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.