Tomato Price : टोमॅटोचे लोटांगण! 250 रुपयांहून भाव थेट जमिनीवर
Tomato Price : अवघ्या काही दिवसांपूर्वी जीवाला घोर लावणाऱ्या टोमॅटोचे पानिपत झाले. भाव कोसळले. 200 ते 300 रुपयांच्या घरात पोहचलेला टोमॅटो आता जमिनीवर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर, कचऱ्यात फेकून दिला. योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हा संताप व्यक्त केला.
नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : एका महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती (Tomato Price) गगनाला भिडलेल्या होत्या. टोमॅटोने पहिल्यांदाच इतकी गगन भरारी घेतली होती. टोमॅटोने ग्राहकांचे तोंडचे पाणी पळवले होते. त्यामुळे देशभरात ग्राहकांनी संताप व्यक्त केला होता. जुलै महिन्याच्या महागाईला (Inflation) टोमॅटोने फोडणी घातली होती. अनेक ग्राहकांनी टोमॅटो खरेदी करणे बंद केले होते. अखेर केंद्र सरकारला धोरणात बदल करत, नेपाळमधून टोमॅटो आयतीला परवानगी द्यावी लागली होती. पण आता टोमॅटो कोसळला आहे. टोमॅटोच्या किंमती काही दिवसांपूर्वी 200 ते 300 रुपयांच्या घरात होत्या. आता तर उत्पादन खर्चही निघत नसल्याने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी (Farmers) टोमॅटो रस्त्यावर आणि कचऱ्यात फेकला. शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळत नसल्याने संताप व्यक्त केला. टोमॅटो राजाचा रंक झाला. पण त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.
2 ते 3 रुपये टोमॅटोचा भाव
आंध्रप्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील पट्टीकोंडा येथील बाजारात एक किलो टोमॅटोची किंमत केवळ 2 ते 3 रुपये मिळाली. 100 किलो टोमॅटो केवळ 200 रुपयांत मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. टोमॅटोचे उत्पादन वाढले आणि बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली तर खरेदीदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे टोमॅटोचे भाव कोसळले. शेतकऱ्यांना टोमॅटोसाठी केलेला खर्चही काढता आला नाही. टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यापूर्वी दक्षिणेतील अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोने अवघ्या एका महिन्यातच लक्षाधीश, कोट्याधीश केले.
ग्राहक मंत्रालयाचा हा भाव
शेतकऱ्यांना खत आणि किटकनाशकाचा आणि इतर खर्च सुद्धा निघाला नाही. त्यांना तोडणीचा खर्च, मजुरी, माल वाहतुकीचा खर्च करावा लागला. पण बाजारात काहीच भाव मिळाला नाही. त्यानाराजीने टोमॅटो रस्त्यावर फेकण्यात आले. तर भारताच्या ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाईटवर टोमॅटोची किंमत 28.4 रुपये प्रति किलोवर पोहचली.
300 रुपयांवर पोहचल्या किंमती
जुलै महिन्यात टोमॅटोच्या किंमतीत मोठी उसळी दिसून आली. देशात टोमॅटोचे दर 300 रुपयेच नाही तर त्याच्याही पुढे गेले होते. जुलै महिन्यात टोमॅटोने महागाईत तेल ओतले. टोमॅटोच्या किंमतींमुळे महागाई जुलै महिन्यात 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचली. महागाईत टोमॅटोने थेट 7 टक्क्यांची भर घातली. एका अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई 6 टक्के असू शकते.
सप्टेंबरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
यापूर्वी महागाईसंबंधीचे सर्व अंदाज फेल गेले आहे. पण यावेळी समाधानकारक पावसामुळे देशातील किरकोळ महागाई दर कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी या किंमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण डाळी, धान्य आणि मसाला पदार्थांमध्ये कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवसांपासून पावसाने खाते उघडले आहे.