इंडिया आघाडीत ठिणगी, G-20 च्या मुद्द्यावर विरोधकांमध्ये दोन गट
G20 Summit : लोकसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीत जी२० वरुन ठिणगी पडल्याचं दिसत आहे. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला काही विरोधकांची उपस्थिती.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभव करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली. पण विरोधीपक्षात अजूनही समन्वय नसल्याचं दिसत आहे. जागावाटप आणि निवडणुकीतील मुद्दे यावरुन काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये संभ्रस आहे. G-20 च्या मुद्द्यावर देखील विरोधक दोन गटात वाटले गेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आमंत्रित केलेल्या डिनरला विरोधी पक्षातील मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. हे काँग्रेसला आवडलेलं नाही. त्यामुळे काँग्रेसने ही गोष्ट बोलून देखील दाखवली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना G-20 परिषदेचे निमंत्रण नसल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे डिनरला उपस्थित होते. हे सर्व इंडिया आघाडीचा भाग आहेत. पण तरी देखील त्यांनी हजेरी लावल्याने काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी आणि बिहार काँग्रेसवर नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मला आश्चर्य वाटते की त्यांना (ममता बॅनर्जी) या नेत्यांसोबत डिनरसाठी दिल्लीला जाण्यास कशामुळे प्रवृत्त झाले. त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे दुसरे काही कारण आहे का?. नरेंद्र मोदी सरकारविरोधातील आपली भूमिका कमकुवत होणार नाही का, असा सवालही त्यांनी केला.
टीएमसीचा पलटवार
अधीर रंजन यांच्या वक्तव्यावर टीएमसीने प्रत्युत्तर दिले. ‘टीएमसीने म्हटले आहे की ममता बॅनर्जी या विरोधी आघाडी भारताला अस्तित्वात आणण्याच्या प्रमुख सुरुवातीच्या शिल्पकारांपैकी एक आहेत. काही गोष्टी प्रोटोकॉलनुसार असतात. ममता बॅनर्जी यांनी काय करावे यावर त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही.’
इंडिया आघाडी यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जी-20 नंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या व्हिएतनामवर केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर हल्ला केला. जयराम रमेश यांनी याबाबत ट्विट केले, त्यानंतर पक्षाचे नेते या मुद्द्यावर आक्रमक झाले.
काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर म्हणाले की, आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत, अध्यक्ष बायडेन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद असते तर त्यांनी स्पष्टीकरण दिले असते. त्यामुळेच ते होऊ दिले नाही. आता बायडेन यांनी मानवी हक्क, मुक्त पत्रकारिता आणि जातीय सलोख्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत जे अत्यंत गंभीर आहे.
खरे तर काँग्रेस सुरुवातीपासूनच नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाला आदर्श मानते आणि म्हणते की, सरकार कोणाचेही असो, आमचे परराष्ट्र धोरण बदलत नाही, हीच देशाची खासियत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली G-20 जाहीरनामा यशस्वी मानत आहे. शशी थरूर, नितीश कुमार यांच्यासह अनेक नेत्यांनी त्याचे कौतुक केले आहे, पण बायडेन यांच्या विधानाला संधी मानून काँग्रेसने मोदी सरकारला कोंडीत पकडण्यात प्रयत्न केला आहे.